Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात आज सकाळपासून अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढल्याचे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ऐकायला मिळते न मिळते तोच आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि त्यांच्या कन्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) हे देखील कोरोना बाधित (COVID-19 Positive) झाल्याचे समोर आले. त्यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. राजेश टोपे यांनी स्वत: ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी" अशी माहिती राजेश टोपे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.हेदेखील वाचा-Eknath Khadse आणि मुलगी Raksha Khadse यांना कोरोनाची लागण, ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती

मागील 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ ही महिन्याभरातील सर्वात मोठी वाढ आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत महाराष्ट्रात 5,427 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 20 लाख 81 हजार 520 वर पोहोचली आहे. तसेच मागील 24 तासांत 38 रुग्ण दगावले असून आतापर्यंत एकूण 51 हजार 669 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.