महाविकासआघाडी सरकार ( Maharashtra Government) आणि राज्यपाल (Governor Of Maharashtra ) यांच्यातील सूप्त संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही. आता या संघर्षाने नवे टोक गाठल्याचे चिन्ह आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या विमानास उड्डाण करण्याची परवानगी नाकारल्याचा प्रकार आज (गुरुवार, 11 फेब्रुवारी) पुढे आला. विमान उड्डाण करण्यास ऐनवेळी परवानगी नाकारल्याने राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना विमानातून खाली उतरावे लागल्याचे समजते. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आपल्याला कल्पना नाही. मंत्रालयात गेल्यावर माहिती घेतो असे म्हटले आहे. तर विरोधी पक्षाने हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे.
प्राप्त माहितीनुसार, राज्यपाल कोश्यारी हे उत्तराखंड येथील एका कार्यक्रमासाठी जाणार होते.त्यासाठी सरकारी विमानाने निश्चित ठिकाणी जाण्यासाठी राज्यपालांनी परवानगी मागितली होती. परंतू विमानास परवानगी नसल्याने राज्यालांना विमानातून खाली उतरावे लागले. राज्यपालांनी विमानात बसण्यापूर्वी काही काळ वाट पाहिली. त्यानंतर ते विमानात बसले आणि विमानात बसून 20 मिनिटांनी खाली उतरले. कारण विमानाने हवेत उड्डाणच घेतले नाही. या प्रकारानंतर राज्यपाल खासगी विमानाने उत्तराखंड येथील कार्यक्रमास जाणार असल्याचे समजते. (हेही वाचा, Governor Bhagat Singh Koshiyari: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याविरुद्धच्या अवमान याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती)
मला माहिती नाही- अजित पवार
घडल्या प्रकाराबाबत विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यपालांना विमानातून खाली उतरावे लागल्याबाबत मला माहिती नाही. ही माहिती मला प्रसारमाध्यमांतून कळते आहे. याबाबत मंत्रालयात गेल्यावर मी माहिती घेईन.
राज्य सरकार अहंकारी- देवेंद्र फडणवीस
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे या पदाचा मान राखला जायला हवा. राज्य सरकार हे राज्यपालांसोबत अहंकाराने वागत आहे. राज्य सरकार अहंकारी आहे. राज्य सरकारच्या वागण्यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होते आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
ही तर सूडभावना- प्रविण दरेकर
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी या प्रकाराला सूडाची भावना म्हटले आहे. राज्यपालांना अशा प्रकारे विमानातून खाली उतरावे लागणे हे दूर्दैवी आहे. राज्य सरकार केवळ सूडाच्या भावनेने काम करत आहे. ही घटना लोकशाहीच्या नियमाची पायमल्ली करणारी आहे, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.
फारच गंभीर बाब- गिरिश महाजन
राज्यपालांना विमानातून खाली उतरावे लागणे आणि तेही केवळ विमानोड्डाणास पवरवानगी नाही म्हणून. ही बाब अत्यंत गंभीर आहे. राज्य सरकारने ही अत्यंत चुकीची पद्धत वापरली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
आम्ही राज्यपालांचा सन्मानच करतो - अस्लम शेख
दरम्यान, महाविकासआघाडी सरकारमधील एक मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले की, आम्ही राज्यपालांचा सन्मान करतो. त्यांना कोणत्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आली याबाबत माहिती घ्यायला हवी. त्यांचा अवमान होणार नाही. पण अनेकदा काही तांत्रिक कारणांमुळे विमानासाठी अनेकांना वाट पाहावी लागते.