
महाराष्ट्रातील 1200 हून अधिक लोकांची तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी, प्रसिद्ध सराफा व्यापारी श्रीकुमार शंकर पिल्लई याला ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पिल्लईने फसवणूक करण्यासाठी एस कुमार ज्वेलर्स आणि एस कुमार गोल्ड अँड डायमंड्स या नावाने महाराष्ट्रभर दुकाने उघडली होती. त्याने देशातील इतर भागातही लोकांना फसवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिल्लई फिक्स डिपॉझिट आणि बीसी स्कीम चालवत ग्राहकांची फसवणूक करत असे.
मुदत ठेव योजनेअंतर्गत तो लोकांना 16 ते 18 टक्के व्याज देण्याचे आश्वासन देत असे. तर दुसऱ्या योजनेंतर्गत वर्षभरात 11 हप्ते भरणाऱ्यांचा 12 वा हप्ता तो स्वत: भरायचा आणि त्या पैशातून दागिने खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांना दिला होता. बहुतांश घटनांमध्ये त्याने मुदत ठेवीदारांना पैसे परत देण्याऐवजी त्यांना अजून काही कालावधीसाठी पैसे गुंतवण्यास भाग पाडल्याचे पोलिसांना आढळून आले.
या प्रकरणातील कल्याण परिसरात राहणाऱ्या फिर्यादीने आरोपीकडे 10 हजार रुपये जमा केले होते, मात्र एक वर्षानंतरही आरोपीने व्याजासह पैसे परत करण्यास नकार दिल्याने त्याबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता शेकडो लोकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात राज्यातील 1216 गुंतवणूकदारांची 57 कोटी 89 लाखांहून अधिकची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा: Dombivli: जादूटोण्याच्या नावाखाली घरकाम करणाऱ्या महिलेकडून वृद्धांची फसवणूक; सोन्या-चांदीच्या दागिन्यासह घरातील मौल्यवान वस्तू केल्या लंपास)
मात्र फसवणूक झालेली रक्कम 70 कोटींपेक्षा जास्त असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांची फसवणूक झाली असल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी 12 लाख 84 हजार रोख रुपये आणि आरोपींच्या 24 बँक खात्यांमध्ये जमा केलेली 60 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. कोर्टात हजर केल्यानंतर आरोपीला 19 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.