Dombivli: डोंबिवलीतील एका वृद्ध व्यक्तीसोबत फसवणूक करणाऱ्या महिलेला मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) अटक केली आहे. वृद्धाला घरात जादूटोणा (Witchcraft) आणि अडथळे असल्याचे सांगून महिलेने घरातील सर्व मौल्यवान सामान लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील मानपाडा परिसरात राहणाऱ्या वृद्धाच्या पत्नीचे निधन झाले असून त्यांचा मुलगा विदेशात आहे. खोणी पलावा येथील त्यांच्या घरात वृद्ध एकटेच राहतात. घरात अन्न शिजवण्यासाठी वृद्धाने त्रिशा नावाच्या महिलेला कामावर ठेवले होते. महिला वृद्धाच्या घरी पोहोचली तेव्हा तिने वृद्धाला सांगितले की, तुमच्या घरात कोणीतरी जादूटोणा केला असून तुमच्या घरात आत्मा फिरत आहे. त्यामुळे तुमचा जीव जीव धोक्यात आहे.
यानंतर महिलेने वृद्धाकडे सोन्या-चांदीचे दागिने मागितले. महिलेने सांगितले की, मी मंत्र-तंत्राच्या मदतीने तुमची समस्या सोडवीन. महिलेने सांगितले की, तुम्ही दोन दिवस दुसऱ्या घरात राहा. तोपर्यंत मी या घरातील आत्मा बाहेर काढील. (हेही वाचा - Mumbai Shocker: वडाळ्यातून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर नवी मुंबईत बलात्कार; आरोपीचा शोध सुरू)
महिलेने सांगितल्यानुसार वृद्ध त्यांच्या दुसऱ्या घरात राहायला गेले. यादरम्यान त्रिशाने घरातील सर्व मौल्यवान वस्तू लंपास केल्या. यानंतर वृद्ध घरी परतले असता त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी मानपाडा पोलिस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि आरोपी महिला त्रिशाला अटक केली. तिच्याकडून सर्व माल जप्त केला आहे. पोलिसांनी महिलेला अटक करून तिच्याकडून दागिने, फ्रिज, रोख रक्कम असा एकूण 15 लाख 87 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी महिला त्रिशा केळुस्करसोबत मरियम नावाच्या महिलेचाही सहभाग होता. सध्या पोलीस तिचा शोध घेत आहेत.