Sunil Deshmukh To Exit BJP: विदर्भात भाजपला धक्का! माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा घेतला निर्णय
Sunil Deshmukh (Photo Credit: Twitter)

माजी अर्थ राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख (Sunil Deshmukh) यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसार माध्यमांत झळकत असलेल्या वृत्तानुसार, देशमुख हे शनिवारी (19 जून) म्हणजेच काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. याच दिवशी मुंबईतील काँग्रेसच्या नूतनीकरण झालेल्या टिळक भवनाचेही उद्घाटन सोहळ्यात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

दरम्यान, डॉ. सुनिल देशमुख म्हणाले की, "माझा राजकीय जन्मच काँग्रेस पक्षातून झाला आहे. यामुळे परतीचे वेध लागले होते. माझी तेव्हाही काँग्रेस सोडून जाण्याची इच्छा नव्हती. परंतु, राजकीय परिस्थितीमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला होता", असे त्यांनी म्हटले आहे. तसेच "मला भाजपकडूनही सन्मानाची वागणूक मिळाली आहे. त्यांच्या विषयी माझ्या मनात कुठलीही कटुता नाही", असेही देशमुख यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “सध्या काहीच ठरविलेले नाही. भविष्यात काय संधी मिळते, ते बघू आणि पक्षश्रेष्ठींचा जो आदेश असेल त्याप्रमाणे कार्य करू," हे देखील वाचा- Governor Bhagat Singh Koshyari's Birthday: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, संजय राऊत यांच्यासह मान्यवरांकडून शुभेच्छा

सुनील देशमुख यांनी 2004 साली अमरावती विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थराज्यमंत्री होते. याचबरोबर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी भाजपमध्ये प्रेवश केला. दरम्यान, भाजपच्या तिकिटावर त्यांनी अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांना पराभूत केले. परंतु, 2019 च्या निवडणुकीत विद्यमान आमदार सुलभा संजय घोडके यांच्यासमोर देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला होता.