Maharashtra Floods: मुंबईत जगातील सर्वात श्रीमंत लोकं असून त्यांनी मदत करावी- संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पुरपरिस्थिती, दरडी कोसळून झालेल्या दुर्घटना यात अनेक नागरिकांचा जीव गेला. अद्याप काहीजण बेपत्ता असून अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. "या पुरग्रस्त आणि दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईतील श्रीमंत नागरिकांनी पुढाकार घ्यावा," असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. "मुंबईत जगातील सर्वात श्रीमंत लोक राहत असून त्यांनी संकटात अडकलेल्या नागरिकांना मदत करावी," असं त्यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Flood: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, पूरपरिस्थीतीचा घेणार आढावा)

पुढे ते म्हणाले की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार पुरग्रस्तांसाठी शक्य ती मदत करत आहे. परंतु, महाराष्ट्राने खूप काही दिलेल्या सर्वांचीच ती जबाबदारी आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्याला हजारो हातांनी मदत होणे गरजेचे आहे."

राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यात अनेकजण बेघर झाले असून काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. पीडितांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या लोकांसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीने मोठी मदत करत आहे. परंतु, राज्यातील श्रीमंत लोकांनी देखील या लोकांच्या गरजेकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही राऊत म्हणाले. त्याचबरोबर महाड, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील गावं पुन्हा उभारण्यासाठी मुंबईमधील श्रीमंत लोकांनी सरकारला मदत करावी, असंही ते म्हणाले.

मदत आणि पुर्नवसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुराचा फटका 1028 गावांना बसला असून यात 164 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण दौरा केला असून आर्थिक मदतीची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पुरग्रस्तांना अन्न, औषधं, कपडे आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठा तातडीने करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.