मुसळधार पावसाने राज्यात अनेक ठिकाणी हाहाकार उडवला. महापूर (Maharashtra Flood) आल्याने अनेक ठिकाणी शहरं, गावं पाण्याखाली गेली. काही ठिकाणी दरडी कोसळून नागरिक ठार झाले. घरं, संसार, वित्त बेचिराक झाले. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका बसला. या सर्व पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर (Paschim Maharashtra Flood) आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील तर उपमुख्यमंत्री कोल्हापूर-सातारा जिल्ह्यातील भागांची पाहणी करणार आहेत. मुसळधार पावसामुळे आलेल्या महापूरामुळे अनेकांना स्थलांतरीत व्हावे लागले आहे. अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त भागातून मोठ्या प्रमाणावर बचतीची मागणी होत आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, ''मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करतील तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधतील.'' (हेही वाचा, Maharashtra Flood: पुरग्रस्त नागरिकांना 10 हजार तर दरडग्रस्तांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजचा दौरा खालील प्रमाणे
- सातारा जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनाग्रस्त भागांची मुख्यमंत्री हवाई पाहणी करतील.
- सकाळी 11.30 वाजता कोयनानगर हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचं आगमन
- सकाळी11.40 वाजता कोयनानगर येथील जि.प. प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस
- भेट,पूरग्रस्तांशी संवाद,
- दुपारी 12.15 वाजता कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक.
- मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
- दुपारी 1.25 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे रवाना
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील पुरग्रस्त भागांची पाहणी करतील. तसेच, पीडितांसोबत संवाद साधतील. अजित पवार हे कोल्हापूर येथून दौऱ्यास सुरुवात करणार होते. परंतू, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाणास अडथळा आला. त्यामुळे नियोजित दौऱ्यात बदल करुन ते सांगलीला रवाना झाले.
मुख्यमंत्री कार्यालय ट्विट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करतील तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधतील.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 26, 2021
अजित पवार यांचा आजचा दौरा खालील प्रमाणे
- सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
- पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सांगलीहून दुपारनंतर कोल्हापूरला येतील.
- पलूस, शिरोळ या भागातील पुरग्रस्त परिसराची पाहणी
- कोल्हापूरमधील शाहू सांस्कृतिक हॉल येथे पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट
- शिवाजी पूल पूरग्रस्त परिसर पाहणी
- कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीबद्दल शासकीय विश्रामगृहात आढावा
- त्यानंतर उपमुख्यमंत्री साताऱ्याच्या दिशेनं रवाना होतील
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच चिपळूण येथे जाऊन पूरग्रस्तांची भेट घेतली. या वेळी त्यांनी दोन-चार दिवसांमध्ये राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल, मात्र आत्ता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न, औषध, कपडेलत्ते व इतर आवश्यक गोष्टी पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकार्यांना निर्देश दिले आहेत, असे पत्रकार परिषदेत सांगितले.