Earthquake. (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राच्या (Maharashtra) नांदेड जिल्ह्यात (Nanded) आज सकाळी 8 वाजून 33 मिनिटांनी भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले आहेत. नांदेडचे जिल्हाधिकारी (District Collector) डॉ. विपीन इटनकर (Dr. Vipin Itankar) यांनी यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर येथे भूकंपाचा केंद्र बिंदू असून त्याची तिव्रता 4.4 रिश्टरस्केल असल्याची माहिती दिली आहे. या भूकंपामुळे अर्धापूर शहरातील तरोडा नाका, सांगली, यासह अनेक भागात जमीन हादरली. ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळाले आहे. सुदैवाने, या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

नांदेड शहरासह जिल्ह्यात बसलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे घरातील भांडीकुंडी, पलंग, खुर्च्या हादरत होत्या, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. तर, अर्धापूर तालुक्यातही भूकंपामुळे घरावरील पत्रे हलल्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीच्या संकेतस्थळावर आहे. मात्र केंद्रबिंदूच्या ठिकाणी आणि इतर आजूबाजूच्या गावांमध्ये भूकंपाचे कोणतेही धक्के जाणवले नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- Maharashtra Monsoon Forecast: मुंबई, ठाणे, पालघर भागांत पुढील 4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

या भूकंपाच्या धक्क्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळत होते. याचपार्श्वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे. तसेच आम्ही शेजारील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, मुख्यालय यांच्याशी संपर्कात असून जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आम्ही घेत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.