COVID19 Ward (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश आले आहे. परंतु, राज्यातील विविध जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. यातच महाराष्ट्र सरकारने कोरोनाशी संबंधित साप्ताहिक आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, राज्यात कोल्हापूरमध्ये (Kolhapur) सर्वाधिक कोरोना संसर्ग आहे. तर, सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोल्हापूरमध्ये कोरोना संक्रमित आढळणाऱ्या रुग्णांचा दर 13.77 टक्के आहे. याचबरोबर सिंधुदुर्गात 55.20 टक्के रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहे. महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे

कोल्हापूरात गेल्या आठवड्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण 15.85 टक्के आहे. तर, ऑक्सिजन बेडचे प्रमाण 67.41 टक्के इतके आहे. आकडेवारीनुसार, राज्यभरात एकूण 16 हजार 570 ऑक्सिजन बेड भरले गेले आहेत. यात दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. तसेच रायगड आणि रत्नागिरीमध्ये संक्रमणाचे प्रमाण अनुक्रमे 12.90 आणि 11.90 टक्के असल्याचे सांगण्यात आले. गोंदियामध्ये संसर्ग दर 0.27 टक्के सर्वात कमी आहे. पुण्यात संसर्ग दर 9.88 टक्के आणि नागपुरात 1.25 टक्के आहे. हे देखील वाचा- मुंबई मध्ये कोरोना संकट असेपर्यंत Property Tax मध्ये वाढ नाही - महापौर किशोरी पेडणेकर

कोल्हापुरात 54.78 टक्के ऑक्सिजन बेड वापरल्या जात असल्याचे सांगण्यात आले, तर वर्धामध्ये सर्वात कमी म्हणजे 0.45 टक्के रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. मुंबईत 23.56 टक्के ऑक्सिजन बेड वापरण्यात येत आहेत आणि ठाणे जिल्ह्यात हा आकडा 10. 74 टक्के आहे.

अहवालानुसार, मुंबईत एकूण 2 हजार 16 ऑक्सिजन बेडचा वापर केला जात आहे. तर, 9 हजार 97 ऑक्सिजन बेड रिक्त आहेत. येथे 951 व्हेंटिलेटर वापरण्यात येत आहेत. तर, 529 व्हेंटिलेटर रिक्त आहेत. पुण्यात 10.90 टक्के आणि नागपुरात 2.17 टक्के ऑक्सिजन बेड वापरण्यात येत आहेत.

राज्यात वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजन बेडची संख्या आणखी कमी झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व महामंडळ आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना निर्बंध शिथिल करण्यास सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे 4 जून रोजी राज्य सरकारने संसर्ग दर आणि ऑक्सिजन बेड वापरल्या जाणाऱ्या विविध प्रशासकीय युनिट्समध्ये पाच टप्प्यांची 'अनलॉक' योजना जाहीर केली होती.