Maharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे परिस्थिती बिकट; 75 टक्के ICU बेड फूल, 12 जिल्ह्यात एकही बेड खाली नाही
Covid patient beds, representational image (PC- Pixabay)

Maharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे सध्या अनियंत्रित परिस्थिती उद्भवली आहे. तसेच वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्यावर लॉकडाऊनची तलवार टांगली आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. यात लॉकडाऊन तसेच इतर विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोना रुग्णांमुळे रुग्णालयांमध्ये बेड्स वेगाने भरत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

बैठकीत राज्य आरोग्य सचिवांनी सांगितलं की, 20250 ICU बेड्सपैकी सुमारे 75 टक्के बेड भरले आहेत. तर 67000 ऑक्सीजन बेड्सपैकी 40 टक्के बेड्स भरले आहेत. सुमारे 11 ते 12 जिल्हे असे आहेत, जिथे बेड्स शिल्लक नाहीत. नंदुरबारमधील रेल्वे बोग्यांमध्ये आयसोलेशन बेड तयार करण्यात आले आहेत. (वाचा - COVID 19: मास्क न वापरणाऱ्यांकडून तब्बल 51.46 कोटी दंड वसूल- मुंबई महापालिका)

जवळपास 95 टक्के रुग्ण असे आहेत, ज्यांच्यावर घरी योग्य उपचार केले जाऊ शकतात. मात्र, अधिक गंभीर असलेल्या रुग्णाला रुग्णालयात आणण्याची आवश्यकता आहे. लोकांना याबद्दल माहिती देण्याची गरज आहे. सोसायटीमध्ये सेपरेशन रूम, ऑक्सिजन सुविधा वाढविण्याची गरज आहे. तसेच, डॉक्टरांनी वॉर रूममधून सर्व बेड्सचे संचालन करावे, अशा सूचनादेखील या बैठकीत देण्यात आल्या. (वाचा - Bavdhan Bagad Yatra 2021: सातारा जिल्ह्यातील बावधन बगाड यात्रेनंतर गावातील 61 ग्रामस्थांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

दरम्यान, रविवारी झालेल्या बैठकीत ऑक्सिजन उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. रविवारी राज्यात 63,294 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तसेच 34,008 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या एकूण 56,5587 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. याशिवाय राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.65% झाले आहे.