Bavdhan Bagad Yatra 2021: महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचे प्रकरणं लक्षात घेता यावर्षी रंगपंचमीनिमित्त साताऱ्यात आयोजित वार्षिक बगाड यात्रा (Bavdhan Bagad Yatra) मिरवणूक रद्द करण्याची घोषणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, तरीदेखील स्थानिक लोकांनी 2 एप्रिल रोजी बावधन गावात हजारो लोकांनी एकत्र येऊन मिरवणूक काढली. यावेळी कोणीही चेहऱ्यावर मास्क लावला नव्हता. तसेच यात्रेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवण्यात आला होता. आता या प्रकाराचा परिणाम दिसून आला आहे. बगाड यात्रेनंतर गावातील 61 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याशिवाय वाई तालुक्यातही कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढला आहे.
दरम्यान, रंगपंचमीनिमित्त आयोजित होणाऱ्या या बगाड यात्रेत सुमारे 2 ते अडीच हजार लोकांनी भाग घेतला होता. त्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, यात्रेत सहभागी लोकांवर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तसेच साथीच्या कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत 100 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या यात्रेत सहभागी असणारे बहुतेक लोक ग्रामपंचायत सदस्य आहेत. (वाचा -मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सचे क्वारंटाइन सेंटरमध्ये रुपांतर केले जाणार, वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेचा निर्णय)
जिल्हा प्रशासनाने या यात्रेवर निर्बंध लादल्यानंतर यावर नाराजी व्यक्त करताना बावधन गावातील रमेश पवार यांनी म्हटलं होत की, सध्या देशात पाच राज्यात निवडणुका होत आहेत. या राज्यात नेते लाखोंच्या जमावाला संबोधित करीत आहेत आणि लोक सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करत आहेत. असं असूनही कोणतीही कार्यवाही केली जात नाही. केवळ धार्मिक कार्यक्रमांवरचं ही बंदी का घातली जाते? असा सवालही यावेळी पवार यांनी उपस्थित केला होता.
सातारा येथील बावधन गावात होळीच्या निमित्ताने गेल्या 80 वर्षांपासून या बागड मिरवणुकीचे आयोजन केले जाते. या यात्रेसंदर्भात स्थानिक ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासनातील लोकांमध्ये गेल्या 1 महिन्यापासून वाटाघाटी सुरू होत्या. प्रशासनाने गावातील गर्दी लक्षा घेता काही निर्बंध लावले होते. मात्र, ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला.