CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter /ANI)

महाराष्ट्रातील कोरोनाचा (Coronavirus) विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार गेल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे. राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा वाढदिवस येत्या 27 जुलैला आहे. परंतु राज्यातील एकूण कोरोनाची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यंदा त्यांचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस न साजरा करण्याच्या निर्णयासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा समर्थकांनी यंदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्स, फ्लेग्स लावू नयेत अशी विनंती केली आहे. त्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दान, रक्तदान आणि प्लाझा थेरपीच्या शिबिरांचे आयोजन करावे असे आवाहन केले आहे.(मी म्हणजे काही डोनाल्ड ट्रम्प नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत रोखठोक भाष्य (Watch Video)

दरम्यान, यापुर्वी आदित्य ठाकरे यांनी सुद्धा त्यांचा वाढदिवस साजरा करणार नसल्याची घोषणा केली होती. तसेच राज ठाकरे, अजित पवार यांनी सुद्धा त्यांचा वाढदिवस यंदा साजरा केला नाही. एकूण राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास काल दिवसभरात 10,576 कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्ण आढळून आले. त्यामुळे संक्रमितांची संख्या 3,37,607 वर पोहचला आहे. यात एकूण 12,556 कोरोना मृतांचाही समावेश आहे. राज्यात काल दिवसभरात 280 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, कोरना व्हायरस संक्रमितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.