महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवे, हीच भूमिका त्यांनी मांडली आहे. बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत केंद्र सरकारला घाबरायचे की विरोधात लढायचे? हे ठरवा असे सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राने आता राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवायला पाहिजे. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल, असेही ते म्हणाले आहे.
“उद्धव ठाकरे कधीही आडपडदा ठेवून बोलत नाही. पोटात एक आणि ओठावर दुसरे असे कधीच नसते. उद्धव ठाकरेंनी केंद्राविरोधात लढण्याची तयारी करताना बिगरभाजप राज्यांना आवाहन केले आहे. या सगळ्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्तरावर करावे, असे माझे मत आहे. उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता होताना मला दिसत आहे. महाराष्ट्राने आता राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवायला पाहिजे. शरद पवार हे काम करत आहेत पण त्यांच्यासोबत सर्वांनीच केले पाहिजे,” असेही यावेळी ते म्हणाले. संजय राऊत यांनी यावेळी जीम, मंदिरे यासंबंधी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे. हे देखील वाचा- केंद्राला घाबरायचे की लढायचे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत रोखठोक विधान
तसेच, फडणवीस यांनी मत मांडले आहे. मतभिन्नता असू शकते. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे जी लोकांपर्यंत पोहोचली आहे. या देशात त्यांच्याइतका सक्षम विरोधीपक्ष नेता पाहिलेला नाही. इतिहासात त्यांचे नाव उत्तम विरोधीपक्ष नेता म्हणून लिहिले जाईल याची खात्री आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.