मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Photo Credit: facebook , devendra.fadnavis)

आगामी लोकसभा, विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेनिहाय प्रगतीपुस्तक सोमवारी तपासले. सह्याद्री अतिथीगृहात हा आढावा घेण्यात आला. गेली चार वर्षे सत्ता राबवत असताना मंत्र्यांनी काय कामे केली? याची विचारपूस फडणवीस यांनी मंत्र्यांकडे केली.

पहिल्याच दिवशी ज्येष्टांचा पेपर

मुख्यमंत्र्यांनी कामाचा आढावा घेताना पहिल्याच दिवशी ज्येष्ठ आणि काही तरुण मंत्र्यांपासून सुरुवात केली. यात महसूलमत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, उद्योग मंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा समावेश होता.

वेगवेगळे बोलवून आढावा

दरम्यान, हा आढावा घेताना मंत्रिपदाच्या आपल्या एकूण कार्यकाळात आपण जनहीताची कोणती कामे केली. केलेल्या एकूण कामापैकी ५ महत्त्वाची कामे तसेच, त्या कामांचे प्रेझेंटेशन द्या, असे मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सांगितले होते. त्यानुसार मंत्र्यांनी आपापल्या कामाचे सादरीकरण केल्याचे समजते. महत्त्वाचे असे की, प्रत्येक मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळे बोलवून हा आढावा घेतला.

मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

दरम्यान, सर्वच मंत्र्यांचा आढावा पूर्ण झाला नसून, उर्वरीत मंत्र्यांच्या कामाचा आढावा येत्या २८ तारखेपर्यंत घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंत्र्यांच्या कार्याचा आढावा घेतल्यावर त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना रेटींग दिले जाईल. मुख्यमंत्र्यांची ही हालचाल म्हणजे नजीकच्या काळात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे संकेत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.