मुंबई मध्ये नाईट लाईफ सुरु होणार का? महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेतला जाणार निर्णय
Mumbai Night Life (Photo Credits: File Image)

पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पदभार स्वीकारताच मुंबई मध्ये नाईट लाईफ (Mumbai Night Life) सुरु करणार असल्याची मोठी घोषणा केली होती, या घोषणेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आज महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. आज, 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची नियोजित बैठक पार पडेल यात नाईट लाईफ सुरु करण्याच्या मुद्द्यावर विशेष चर्चा होणार असून त्यानंतर याबाबत निश्चित निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफचा प्रस्ताव समोर ठेवताच स्वतः महाविकास आघाडीचे नेते आणि गृहमंत्री अनिल परब यांनी देखील या प्रस्तावाला विरोध करत यामुळे पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त तणाव पडेल आणि यासाठी सरकार यंत्रणा सज्ज नाही असे म्हंटले होते.

दुसरीकडे, भाजप नेत्यांनी या घोषणेचा नैतिकतेवर व संस्कृतीवर परिणाम होईल असे म्हणत विरोध दर्शवला होता. भाजप नेते राज पुरोहित यांनी हाच मुद्दा उचलून धरता नाईट लाईफ म्हणजे अय्याशीला वर आणण्याची योजना आहे, यामुळे मद्यपान सहित अन्य वाईट सवयींना खतपाणी मिळेल, बलात्काराच्या घटना वाढतील असे मत दिले होते, तर आशिष शेलार यांनी अशा पाश्चिमात्य योजना आणू पाहणाऱ्या महाविकास आघाडीला धारेवर धरत, राज्यात अन्य महत्वाचे प्रश्न असताना अशा प्रकारच्या अनावश्यक योजना आणू हे सरकार कोणत्या बाजूला झुकत आहे असा सवाल केला होता.

मुंबई पाठोपाठ पुण्यातही नाईटलाईफ सुरु होणार? अजित पवार यांनी दिले हे उत्तर

दरम्यान, महाविकासाआघाडीच्या नेत्यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे, आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा करतानाच हा निर्णय हा अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल असा दावा केला होता. तूर्तास मुंबईतील कोणत्या भागात याची अंमलबजावणी करता येईल याची चाचपणी सुरु आहे. मुंबईत जर हा प्रयत्न यशस्वी झाला तर येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात याची अंमलबजावणी केली जाण्याची देखील शक्यता आहे. तत्पूर्वी मात्र आजच्या बैठकीत या निर्णयाचे काय भवितव्य ठरेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.