मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credit ANI)

राज्यात भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्या युतीने मोठा विजय प्राप्त केल्यानंतर, सर्वत्र चर्चा होती ती मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion).  या बाबत अनेक वावड्या उठल्यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले आहे. सध्या मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. नव्या मंत्रिमंडळात राधाकृष विखे पाटील यांना मंत्रिपद मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी, 16 जून रोजी सकाळी 11 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी राजभवनात पार पडणार आहे.

सोमवार पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. याआधी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या प्रमाणे अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी नव्या लोकांना मंत्रिमंडळात संधी देताना, भाजपाकडून 5 ते 6 तर शिवसेनेकडून दोन मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपदाचा समावेश असेल. यात राधा कृष्ण विखे पाटील आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांची जागा निश्चित असल्याचे समजते. (हेही वाचा: पक्षांतर्गत कलह होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाकारले उपमुख्यमंत्रीपद, सूत्रांची माहिती)

या लोकांचा होऊ शकतो समावेश –

औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे भाजप आमदार अतुल सावे

मोर्शी भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे

रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर

अनिल बोंडे व संजय कुटे यांच्यापैकी एक, तर शिवाजीराव नाईक व अतुल सावे यांच्यापैकी एक

या लोकांना मिळू शकतो डच्चू -

राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, गडचिरोली पालकमंत्री अंबरीश आत्राम

दरम्यान, उपमुख्यमंत्री पदावरून सध्या शिवसेनेत कलह माजला आहे. एकनाथ शिंदे हे स्वतः उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार मनात आहेत, मात्र रामदास कदम, सुभाष देसाई व दिवाकर रावते यांचा त्याला विरोध आहे. दुसरीकडे कार्यकर्त्यांची आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करावे ही मागणी जोर धरू लागली आहे.