Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

महाराष्ट्रात यंदा मार्च-एप्रिल 2022 मध्ये पार पडलेल्या 10वी (SSC Result), 12वीचे निकाल (HSC Result) जाहीर झाले आहेत. या परीक्षा यंदा कोरोनाच्या सावटाखालीच पार पडल्या. त्यामुळे मागील 2 वर्ष कोरोना परिस्थितीशी झुंजत आणि अनेक शैक्षणिक अडथळे पार करून झाल्याने बोर्डाने विद्यार्थ्यांना काही सूट दिली होती. यामध्ये अभ्यासक्रम, परीक्षेची वेळ यामध्ये सूट होती पण आता 15 जून पासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे आणि यापूर्वी दिलेली सूट देखील आता बंद होणार आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आता शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये होणारी बोर्डाची 10वी, 12ची परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. तसेच लेखी परीक्षेसाठी अधिकचा वेळ देखील दिला जाणार नाही. याबाबतचा अधिकृत निर्णय 'एससीईआरटी'कडून येत्या काही दिवसांत जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोरोना संकटामुळे मागील 2 वर्ष विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. काही ठिकाणी इंटरनेट सेवा सुरळित नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होती तसेच सलग लिखाणाचाही सराव गेला होता परिणामी ऑफलाईन परीक्षा घेताना यंदा 75% अभ्यासक्रम आणि 15-30 मिनिटं अधिकचा लेखी परीक्षेला वेळ अशा मुभा देण्यात आल्या होत्या.

यंदाचं शैक्षणिक वर्ष महाराष्ट्रात 15 जून पासून सुरू झालं आहे. विद्यार्थ्यांचं पुन्हा ऑफलाईन शिक्षण सुरू झालं आहे. यामध्ये केवळ विदर्भात उष्णतेची लाट असल्याने शाळा 27 जून पासून सुरू होतील पण आता बोर्डाच्या परीक्षापूर्वीप्रमाणेच होणार असल्याने त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी यंदा अभ्यासाला सुरूवात करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राचा बोर्डाचा 2021-22 चा बोर्डाचा निकाल यंदा बारावीचा 94.22 % आणि दहावीचा 96.94% लागला आहे. मागील वर्षी बोर्डाचा निकाल परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावला होता.