MSBSHSE 10th Results 2022: महाराष्ट्रात आज (17 जून) दिवशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE ) दहावीच्या निकालाची (Maharashtra Board Class 10 Result) अखेर घोषणा झाली आहे. यंदा कोरोना संकटादरम्यान ऑनलाईन शिक्षणासोबतच अनेक अडथळे पार पाडत पहिल्यांदा विद्यार्थी लेखी परीक्षेला सामोरे गेले आहेत. या परीक्षेचा राज्याचा निकाल 96.94 % लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर यंंदाच्या 10वी निकालामध्ये नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. यंदा 12वी प्रमाणे 10वीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. आता 1 वाजता विद्यार्थी त्यांचा निकाल http://mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org https://ssc.mahresults.org.in या अधिकृत वेबसाईट सह अन्य काही थर्ड पार्टी वेब्साईट्स वर पाहू शकणार आहेत.
महाराष्ट्रात यंदा दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधी मध्ये पार पडली आहे. यामध्ये एकूण 17 लाखांच्या आसपास विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यामध्ये 8,89,506 मुलं तर 7,49,458 मुलींचा समावेश आहे. यंदा उत्तीर्ण मुलींचं प्रमाण 97.96% आहे तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 96.06% आहे, 94.40% दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.नक्की वाचा: What To Do After 10th: 10 वी नंतर काय करावे? कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा? जाणून घ्या.
विभागानुसार निकालाची टक्केवारी
पुणे- 96.96%
नागपुर- 97%
औरंगाबाद- 96.33%
मुंबई- 96.94%
कोल्हापूर - 98.50%
अमरावती - 96.81 %
नाशिक - 95.90%
लातूर- 97.27%
कोकण - 99.27%
जर तुम्ही तुमच्या निकालावर नाखूश असाल तर गुणपडताळणीसाठी 20-29 जून, छायाप्रतीसाठी 20 जून ते 9 ऑगस्ट या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या पुरवणी आणि श्रेणीसुधार परीक्षेचे अर्ज 20 जूनपासून स्वीकारले जातील. उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी, छायाप्रत किंवा पुनर्मूल्यांकन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी https://varification.mh-ssc.ac.in/ संकेतस्थळाद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.