Maharashtra Assembly Winter Session 2023: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश आजपासून सुरु होत आहे. हे अधिवेशन 10 दिवस चालणार आहे. जे राज्याची उपराजधानी नागपूर (Nagpur) येथे पार पडणार आहे. नागपूरमधील ऋतुमान या काळात थंड असते. प्रचंड थंडीचा कडाका येथे जाणवत असतो. अशा वेळी राज्यातील ((Maharashtra News)) एकूण स्थिती आणि रंगलेले राजकारण पाहता नागपूरच्या राजकीय वातावरणातील तापमान अधिक वाढल्याचे पाहायला मिळू शकते. या काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष उडण्याची शक्यता आहे.
नागपूर अधिवेशनात प्रामुख्याने, मराठा आरक्षण, अवकाळी पाऊस, शोतकऱ्याचे नुकसान, आरोग्य खात्यातील भ्रष्टाचारावरुन केले जाणारे आरोप, ड्रग्जचे कारखाने, ललीत पाटील ड्रग्ज प्रकरण यांसह इतर अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्याला राज्य सरकारने दिलेली उत्तरे कशी असतील याबाबत उत्सुकता आहे. शिवाय आरक्षणाच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार काही निर्णय घेते का? यावरही अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. (हेही वाचा, Winter Session of Parliament 2023: लोकसभेमध्ये भाजपा खासदारांनी दिल्या PM Narendra Modi यांच्या उपस्थितीत 'तिसरी बार मोदी सरकार' च्या घोषणा (Watch Video))
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची रुपरेशाही ठरली आहे. त्यानुसार, राज्य सरकारने वेळोवेळी काढलेले अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवले जातील. ज्यामध्ये महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अध्यादेश 2023 (दुसरी सुधारणा) (वित्त विभाग), महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2023( उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग), महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक 2023(गृहनिर्माण विभाग), सन 2023-24 च्या पुरवण्या मागण्या सादर केल्या जातील. - शासकिय कामकाज, त्यांनंतर शोकप्रस्ताव सादर केला जाईल, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांची रणनिती आदींचा समावेश आहे.
राज्यात पडलेला अवकाळी पाऊस, त्यामुळे झालेले नुकसान दुसऱ्या बाजूला काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश्य स्थिती यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकडे विरोधकांचा प्रयत्न असेल. त्याला राज्य सरकार काय उत्तर देते याबाबतही उत्सुकता आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका पाहता कदाचित राज्य सरकारचे आपल्या कार्यकाळातील हे शेवटचेच अधिवेशन असू शकते. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. असे असताना राज्याच्या राजकारणात पाठिमागील काही दिवसांपासून घडलेल्या घडामोडी पाहता लोकसभेसोबतही विधानसभा घेतल्या जाऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसे घडले तर आगामी अधिवेशनापूर्वीच राज्य विधानसभेच्याही निवडणुका लागू शकतात.. त्यामुळे या अधिवेशनात अधिकाधिक विधेयके मंजूर करण्यावर राज्य सरकारचा भर असेल. तर सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याकडे विरोधकांचे लक्ष असेल.