Uddhav Thackeray, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. विधिमंडळ कामकाज सुरु झाल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विरोधक दोन्ही सभागृहांमध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कर्नाटक महाराष्ट सीमावाद (Maharashtra Karnataka Border Dispute), नागपूर येथील एनआयटी घोटाळा (NIT land Scam), सिल्लोड मतदारसंघातील गायरान (Gairan Land Scam) जमीनींचा विषय विरोधकांनी लावून धरला. प्रामुख्याने वरीष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तर कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) विशेष आक्रमक झालेले दिसले.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्र्यांकडून वारंवावर महाराष्ट्राबद्दल केल्या जाणाऱ्या अवमानकारक वक्तव्यांबद्दल राज्य सरकार काय पावले उचलत आहे याबाबत जाब विचारला. तसेच, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र असा उल्लेख करत सीमेवरील गावांवर होत असलेल्या कर्नाटकी जुलूम, अन्यायाविरोधात सरकारची भूमिका काय असा सवालही त्यांनी विचारला. याच वेळी त्यांनी सभागृहाला एक पेनड्राईव्ह आणि काही पुस्तकं देत सीमाभागातील मराठी बांधवांची महाराष्ट्राशी नाते कसे आणि किती घट्ट आहे याबाबत माहिती दिली. सदर पेन ड्राईव्ह आणि पुस्तकं विधिमंडळ सदस्यांना द्यावीत असेही म्हटले. (हेही वाचा, Aaditya Thackeray लक्ष्य होताच उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये; संजय राऊत यांच्यासह नागपूर येथे दाखल)

अजित पवार यांनीही नागपूर येथील एनआयटी जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही गंभीर आरोप केला. सत्तार यांनी वाशिम येथे गायरान जमिनीचा 37 एकरांचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात केला.

दरम्यान, विधिमंडळ परिसर आणि दोन्ही सभागृहात आज जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलने केली. विशेष म्हणजे सत्ताधारी आमदारांनीही आंदोलने केली. विरोधकांनी आंदोलने केल्याचे जनतेने अनेकदा पाहिले आहे. सत्ताधाऱ्यांनी आंदोलने केल्याचे क्विचित आजवर पाहायला मिळाले आहे. सभागृहातही सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा जोरदार सामना रंगललेला पाहायला मिळाले.