Mahatma Jyotirao Phule and Savitribai Phule | X

सामाजिक न्याय आणि स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणार्‍या ज्योतिबा फुले (Mahatma Jyotirao Phule) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा ही शिफारस आज विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आली आहे. भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. विविध क्षेत्रात अमुल्य कामगिरी करणार्‍या व्यक्तीला या पुरस्काराने गौरवले जाते. दरम्यान भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि त्यांना प्रेरणा देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा मरणोत्तर भारतरत्न या उपाधीने सन्मान व्हावा यासाठी आता सरकार केंद्राकडे शिफारस करणार आहे.

आज विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा ठराव पारित केला आहे. त्याला आमदारांनी पाठिंबा दिला आहे.  (नक्की वाचा: 'माता सावित्रीबाई गीत' सहित 'या' 5 गाण्यांमधून जाणून घ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिकेच्या कार्याची महती).

सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला ठराव

विधानसभेत ठरावाला पाठिंबा देताना आमदार छगन भुजबळ यांनी जोतीराव फुले यांना देशातील जनतेने दिलेली 'महात्मा' ही पदवी सर्वोच्च पदवी आहे. भारतात फक्त महात्मा फुले आणि महात्मा गांधी हे दोनच महात्मे असल्यामुळे भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये, अशी भूमिका आज या ठरावावर विधानसभेत बोलताना भुजबळांनी मांडली आहे.

दरम्यान 2016 मध्येही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकार कडून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.