अजीत पवार यांच्या राजीनाम्यामागे ही कारणे असू शकतात
Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा (Ajit Pawar Resignation) दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाली. अजित पवार यांनी नेमका राजीनामा कोणत्या कारणामुळे दिला? विशेष असे की, अजित पवार वगळता इतक कोणासही या राजीनाम्याबाबत कोणालाच काही कल्पना नाही. दस्तुरखुद्द पार्थ पवार, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि प्रवक्ते यांनाही माहिती नव्हती. त्यामुळे हा प्रश्न जोर देऊन विचारला जात आहे की, अजित पवार यांनी राजीनामा का दिला? अजित पवार यांच्या राजीनाम्यामागे नेमके काय कारण असू शकते, या संभाव्य कारणांचा हा एक धांडोळा.

अजित पवार यांना पक्षांतर्गत विरोध?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांना अंतर्गत विरोध करणारा एक मोठा गट असल्याची जोरदार चर्चा आहे. या गटाला पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडून अजित पवार विरोधी गटाला प्राधान्य दिल्याने अजित पवार नाराज असल्याचेही बोलले जात आहे.

प्रतिमासंवर्धनासाठी राजीनामा?

महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणात नाव आल्यामुळे व्यथित झालेल्या राजकारणामुळे अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असावा अशीही शक्यता आहे. काही राजकीय अभ्यासकांना वाटते की, आमदारकीचा राजीनामा देऊन थेट चौकशीला सामोरे जावे आणि काय तो सोक्षमोक्ष लावावा असा विचार अजित पवार यांनी केला असावा, असे काहींना वाटते. (हेही वाचा, अजित पवार राजकारण सोडून करणार शेती, उद्योग?)

राजकारणाची घसरलेली पातळी

अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, मी अजित पवार यांच्या चिरंजीवांकडून माहिती घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या राजकारणाची पातळी प्रचंड घसरली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी राजकारण सोडून शेती अथवा इतर उद्योक केलेला बरा, असा वडिलकीचा सल्ला दिला, असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार खरोखरच विद्यमान राजकारणाला कंटाळले असावेत असा अर्थ काढला जात आहे.

धक्कातंत्राचा वापर

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या गलीतगात्र झाला आहे. पक्षाचे अनेक नेते इतर पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक मरगळ आली आहे. अशा स्थितीत पक्षाध्यक्ष शरद पवार एकहाती किल्ला लढवत आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या मनात आपण झाकोळले गेल्याची भावना निर्माण झाली असावी. त्यातून पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करत राजीनामा दिला असावा, असे बोलले जात आहे.