विधानसभा निवडणूक 2019: आदित्य ठाकरे आज दाखल करणार उमेदवारी अर्ज; पदयात्रेच्या निमित्ताने शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन
Yuva Sena Chief Aditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

Maharashtra Assembly Elections 2019: शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) विधानसभा निवडणूक लढण्यासाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना वरळी विधानसभा (Worli Vidhan Sabha) मतदारसंघाची निवड केली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे आज वरळी येथे पदयात्राही काढणार आहेत. अर्ज भरताना आदित्य ठाकरे यांच्यासोबत स्वत: शिवसेना पक्षप्रुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), ज्येष्ठ शिवसेना नेते आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित राहणाह आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा आदित्य यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे समजते.

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी असलेल्या ठाकरे कुटुंबियातील आजवर एकाही व्यक्तीने निवडणूक लढवली नव्हीत. निवडणूक न लढवता सत्तेचा रिमोट आपल्या हाती ठेवायचा ही बहुदा ठाकरे घराण्याची परंपराच झाली होती. मात्र, आदित्य ठाकरे यांनी ही परंपरा मोडीत काढत प्रत्यक्ष निवडणुकीस समोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आदित्य ठाकरे हे निवडणूक लढविणारे पहिलेच ठाकरे (शिवसेना) ठरले आहेत. आदित्य ठाकरे यांची उमेदवारी वरळी विधानसभा मतदारसंघातून जाहीर होताच शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच आदित्य यांचा विजय निश्चित असल्याचा दावा शिवसैनिक करत आहे. (हेही वाचा, Thackeray vs Thackeray: ठाकरे विरुद्ध ठाकरे उमदेवार देणार? वरळी विधानसभा मतदारसंघात सामना रंगणार?)

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनीही नुकताच शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची वरळीत ताकद अधिकच वाढली आहे. वरळी मतदारसंघ हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख गेली अनेक वर्षे आहे. हा विचार करुन शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे. दरम्यान, या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना आव्हान देणारा उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता आहे. राज ठाकरे यांची मनसे इथे उमेदवार देणार नाही, अशी चर्चा आहे. तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी इथे तगड्या उमेदवाराच्या शोधात आहेत.