
लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर आता प्रत्येक राज्यात तयारी चालू आहे ती विधानसभेची (Assembly Elections). ज्या पक्षांना लोकसभा निवडणुकीत कामगिरी दाखवता आली नाही, त्यांचे सर्व लक्ष विधानसभा निवडणुकीवर आहे आणि त्यासाठी जोरदार मोर्चे बांधणीही चालू आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) पराभव कॉंग्रेसच्या अतिशय जिव्हारी लागला आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे चार महिने बाकी असताना, पुन्हा नव्याने उभारी घेण्याऐवजी राज्य काँग्रेस अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी (All India Congress Committee) राज्यातील भूमिकेबाबत प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत आहे.
राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या मतावर ठाम आहेत. मात्र त्यांच्यानंतर ती जागा कोण घेईल याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. या दरम्यान पक्ष आपला बहुमूल्य वेळ दवडत आहे, असे मत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे. याबात बोलताना एक वरिष्ठ नेता म्हणाला. ‘निवडणुकीसाठी 100 पेक्षा कमी दिवस बाकी नाहीत. आम्ही अजूनही बॅकफूटवर खेळत आहोत. पक्षाचे नेतृत्व कोण करेल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. या क्षणी पक्षाला कोणतीही दिशा मिळत नाही त्यामुळे गोंधळाची स्थितीत आहे.' (हेही वाचा: राहुल गांधी यांना जामीन मंजूर; गौरी लंकेश हत्याप्रकरणी ट्विटवर ठाम असल्याचा कोर्टात दावा)
शनिवारी आगामी निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत राहुल यांची एक बैठक पार पडली. मात्र त्यातून काही नवीन योजना निर्माण होण्याऐवजी, राज्यातील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याचे वृत्त आले. आता चव्हाण यांचा राजीनामा मंजूर झाला असून, त्यांच्या जागी नव्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र या सर्व गोष्टींवर बराच वेळ खर्च होत आहे, कारण आतापर्यंत युती होणाऱ्या पक्षांशी जागा वाटपाबद्दल बोलणी होणे अपेक्षित होते.
अशा परिस्थितीत कॉंग्रेससोबत युती करण्याच्या मार्गावर असलेला एनसीपी (NCP) देखील एआयसीसीच्या विकासाबद्दल चिंताग्रस्त आहे. कारण विधानसभेसाठी देखील एनसीपी कॉंग्रेससोबत युती करणार आहे. दरम्यान राज्यात कॉंग्रेसचा फक्त एकच खासदार निवडून आला आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्षनेते हे पद आपोआप बाळासाहेब थोरात यांना मिळाले. आता प्रदेशाध्यक्ष पदासाठीही त्यांच्या नावाचा निर्णय झाला आहे. दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीत बाळासाहेब थोरात यांच्या नावावर सहमती झाली. नगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग सात वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. मराठा समाजाचे मातब्बर नेते अशी ओळख असलेले बाळासाहेब कॉंग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत.