![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/10/Satta-380x214.jpg)
महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणूकीसाठी 288 मतदारसंघाच्या जागांवर मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आजच्या मतदाना मधून अनेक दिग्गज नेतेमंडळींच्या भाग्याचा फैसला मतदार करणार आहेत. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुती आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी मध्ये जोरदार चुरस रंगणार आहे. तत्पूर्वी यंदाच्या विधानसभा निवडणूकीत कोणची सत्ता येणार यासाठी सट्टाबाजारात कोटींच्या घरात सट्टा राजकीय पक्षांवर लावण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आणि हरियाणा येथे पहिल्याच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सट्टाबाजारात सुद्धा खळबळ सुरु झाली असून त्यांनी निवडणूकीचा निकाल काय असेल याचा सुद्धा अंदाज व्यक्त केला आहे. तर निवडणूकीवर जवजवळ 30 हजार कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार भाजप-शिवसेना महायुतीला महाराष्ट्रात 288 पैकी 210-215 दरम्यान जागांवर विजय मिळवता येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीला 55-60 दरम्यान जागांवर समाधान मानावे लागणार आहे.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ते धननंजय मुंडे यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा आज मतदार करणार फैसला)
तर सट्टाबाजारानुसार भाजपवर 120 जागांसाठी 1.60 पैसे, शिवसेना 65 जागांवर 3.00 रुपये, काँग्रेस-2.50 पैसे आणि राष्ट्रवादीला 3.50 पैसे असा भाव दिला आहे. एवढेच नाही सट्टाबाजार हा मोबाईल अॅप आणि हायटेक पद्धतीने निवडणूकीवर सट्टा लावण्यात आला आहे. प्रत्येक निवडणूकीसाठी सट्टाबाजारात कोट्यावधींचा सट्टा लावण्यात येतो.याबाबत एबीपी माझा यांनी अधिक माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणूकीचा निकाल येत्या 24 ऑक्टोबरला जाहीर केला जाणार आहे.विधानसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी याकरिता राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात ठेवण्यात आले आहे, तसेच मतदानाच्या दोन दिवस आधीपासून मद्य विक्री बंद ठेवण्यात आली असल्याने अतिउत्साही कार्यकर्त्यांवर चाप बसवण्यात आला आहे. याच प्रमाणे 9000 हुन अधिक मतदान केंद्राच्या परिसरात लाईव्ह वेबकास्टिंगची सोय करण्यात आली आहे.