Assembly Election 2019: लवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून त्यासाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. त्यात सर्वांचा चर्चेचा विषय बनलेल्या शिवसेना-भाजप युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. त्यामुळे येत्या 19 सप्टेंबरला शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) युतीची घोषणा होण्याची शक्यता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी म्हटले आहे. झी 24 तास ने दिलेल्या वृत्तानुसार, 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजप अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) उपस्थित राहणार आहेत. यावेळी युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे लाड यांच्यांकडून सांगण्यात आले आहे. या संदर्भात शिवसेनेची महत्त्वाची बैठक सुरु असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या जागांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार करणार आहेत. नंतर ही यादी घेऊन मी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना दाखवून जागांचे ठरवू, असे सांगत युतीच्या जागावाटप तिढ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला होता. दरम्यान, शिवसेना 135-135 च्या फॉर्म्युलावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजप शिवसेनेला 110 ते 116 जागा देण्यास राजी आहे. त्यामुळे युती होणार की नाही, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, शिवसेना निम्या-निम्या जागावर अजूनही ठाम असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेने 288 मतदारसंघांसाठी चाचपणी सुरू केली आहे. मातोश्रीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक सुरू आहे. युतीच्या 50-50 टक्के फॉर्म्युलाबाबत प्रश्नचिन्हे उपस्थित झाले आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच पुन्हा यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महायुतीच सत्ता मिळवेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच महायुतीचे जागावाटप लवकरच जाहीर केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.