महायुतीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये खलबते सुरु; जागावाटपाबद्दलची पहिली बैठक फिसकटली, जाणून घ्या काय असेल फॉर्म्युला
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (फोटो सौजन्य-ट्वीटर)

लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्या युतीने भरीव कामगिरी करत महाराष्ट्रात भरघोस यश मिळवले. आता उत्सुकता लागली आहे ती विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election). येत्या नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका पार पडलीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यासाठी आता प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजप हे युतीने लढणार आहेत. याच्या जागा वाटपाची पहिली बैठक काल पार पडली यामध्ये शिवसेना 110 जागांवर अडून राहिली तर भाजप 160 आणि मित्रपक्षांना 18 जागा. अशा रीतीने कालची बैठक फिसकटली असल्याचे समोर येत आहेत.

भाजपकडून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांच्यामध्ये ही बैठक झाली. यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीआधी भाजपने आपला सर्व्हे केला होता. त्यानुसार दोन्ही पक्षांनी आपापल्या जागांमधील काही जागा मित्रपक्षांना द्याव्यात असे भाजपचे म्हणणे होते, त्याला शिवसेनेने नकार दिला. तसेच शिवसेनेला ज्या 50 जागा हव्या आहेत त्या त्यांना देणे हे भाजपला धोक्याचे वाटत आहेत. मात्र ज्या जागा शिवसेनेच्या आहेत त्या त्यांना देण्यासाठी भाजप तयार आहे. (हेही वाचा: आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आचारसंहिता 13 सप्टेंबर पासून लागू होणार- रावसाहेब दानवे)

भाजपच्या मते विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी शिवसनेला 100 जागा मिळाव्यात. भाजपने केलेल्या सर्व्हेच्या अंदाजानुसार त्यांना 160 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर भाष्य करताना खा. संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या भेटीदरम्यानच्या एका घटनेची आठवण करून देत, युतीमध्ये दोन्ही पक्ष समान जागा लढवतील असे ठरले असल्याचे सांगितले आहे. असो आता पुन्हा एकद दोन्ही पक्षांमध्ये बैठका होऊन युतीचा नवा फॉर्म्युला ठरवला जाणार आहे.