महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019; पंकजा मुंडे, विदया चव्हाण, मनिषा चौधरी, विद्या ठाकूर यांच्यासह 152 महिलांना उमेदवारी
Photo Credit - File Photo

यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण 3 हजार 237 उमेदवार रिंगणार उतरले आहेत. यामध्ये 235 महिला उमेदवारांचा समावेश असून ही टक्केवारी 6.3 इतकी आहे. महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात (Maharashtra Assembly constituency) 152 मतदारसंघात महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पुरुषांच्या टक्केवारीत महिला उमेदवार खूपच कमी आहेत. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत महिलांची यंदाची टक्केवारी वाढली आहे. परंतु, असे असले तरी काही महिला केवळ नावापुरत्या राजकारणात आहेत. बऱ्याचदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत महिला निवडून येतात. मात्र, सर्व कारभार त्यांच्या घरातील पुरुष सांभाळतात. सध्या महाराष्ट्रात राजकीय कुटुंबातील महिलांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यावर्षी राज्यात 8 कोटी 97 लाख मतदार असून त्यात 4 कोटी 38 लाख महिला मतदारांचा समावेश आहे.

हेही वाचा - विधानसभा मतदार यादीत ऑनलाईन पद्धतीने ‘असं’ शोधा तुमचं नाव

मुंबईमध्ये महिला उमेदवारांची संख्या कमी –

मुंबईमधील 36 मतदारसंघासाठी एकूण 334 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मात्र यात महिला उमेदवारांची संख्या केवळ 31 एवढीच आहे. मुंबईमध्ये मनिषा चौधरी दहीसर, भारती लव्हेकर वर्सोवा आणि विद्या ठाकूर गोरेगाव मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. काँग्रेसने मुंबईमध्ये केवळ3 महिला उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने फक्त एका महिला उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोशी मतदारसंघातून विद्या चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्रात महिला मतदारांची संख्या जास्त –

महाराष्ट्रात महिला उमेदवारांची संख्या कमी असली तरी महिला मतदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या राज्यात एकूण मतदारांपैकी 47 टक्के महिला मतदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघापैकी 20 महिला आमदार विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. परंतु, विधानसभेवर निवडून गेलेल्या या महिला राजकीय कुटुंबातील आहेत. सामान्य कुटुंबातील महिलांना राजकारणात संधी मिळणं अत्यंत कठीण होऊन बसलं आहे. ज्या महिला राजकीय कुटुंबातील आहेत, त्यांना जनतेच्या प्रश्नांची जाणीव नसते. त्यामुळे विधानसभेमध्ये प्रश्न मांडताना त्यात जिवंतपणा आढळत नाही.