महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी AIMIM स्वबळावर लढणार; इम्तियाज जलिल यांच्याकडून मालेगाव, पुणे, नांदेड येथील उमेदवारी घोषित
Imtiaz Jaleel | File Photo | (Photo Credits: Twitter/imtiaz jaleel)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2019) अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलेली असताना उमेदवारी कोणाला मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. कुठे अंतर्गत वादातून पक्षांतर तर कुठे युतीमध्ये फूट पाडण्याचे देखील अनेक प्रसंग रोज समोर येत असतात. अशातच आता एमआयएम (AIMIM)  ने देखील वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) सोबत युतीला ब्रेक देऊन आपल्या स्वबळावर महाराष्ट्रात 74 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज एमआयएमच्या इम्तियाज जलील (Imtiaz jaleel) यांनी मालेगाव (Malegaon), नांदेड (Nanded) व वडगावशेरी (Vadgaonsheri)  या मतदारसंघातील उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मालेगाव मध्य संघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीक, पुणे वडगावशेरी येथून डॅनियल लांडगे व नांदेड उत्तर येथून मोहम्मद फिरोज खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय आज औरंगाबाद मध्ये , बडगाव, भोकर, मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या यापूढे टप्प्याने इतर मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. यावेळी युतीमध्ये लढण्याचे बंधन नसल्याने अलिप्तपणे हा निर्णय घेण्यास मदत झाल्याचे इम्तियाज यांनी आज आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले.

ANI ट्विट

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम व वंचित बहुजन आघाडीने एकत्रित निवडणूक लढवली होती, यामध्ये इम्तियाज जलील निवडून आले होते, मात्र अंतर्गत वादामुळे आता हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे समजत आहे. राजकीय विश्लेषक व नेतेंमंडळींनी वर्तवलेल्या अंदाजानुसार गणेशेत्सवाच्या नंतर म्हणजेच साधारण 13 सप्टेंबर पासून राज्यात आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे आहेत तसेच पुढील महिन्यात 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान निवडणुका पार पडू शकतात अशी शक्यता आहे.