Maharashtra Assembly Election 2019: आगामी विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी भाजप (BJP) विरोधात असलेल्या काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी पक्षातील विरोधकांना आक्रमकपणे धोबीपछाड देत आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर विरोधी पक्षातील नेत्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणत विरोधकांच्या भात्यातील एक एक बाण काढण्याचा भाजप पद्धतशीर प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाचा यशस्वी भाग म्हणून भाजपने मुंबई शहरात उद्या (बुधवार, 31 जुलै 2019) रोजी पक्ष प्रवेशाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinh Raje Bhosale), गणेश नाईक (Ganesh Naik), चित्रा वाघ (Ganesh Naik) इत्यादी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला तर, कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) हे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपत प्रवेश करणार असल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील इतरही अनेक दिग्गज याच कार्यक्रमात प्रवेश करणार असल्याचे समजते.
शिवेंद्रसिंहराजे भोसले
शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साताऱ्यातील आमदार आहेत. गेली अनेक वर्षे ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करतात. मात्र, पक्षाचेच खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत असलेले त्यांचे मतभेद जगजाहीर आहेत. या दोघांचाही उघड संघर्ष साताऱ्यातील जनतेने अनेकदा पाहिला आहे. दरम्यान, नीरा कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या सोलापूर, साताऱ्याच्या पाणी प्रश्नावरुनही दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडेही अंगुलीनिर्देश करण्यात आला होता. या सर्व प्रकारानंतर शिवेंद्रसिंहराजे यांच्या मनात काहीतरी राजकीय वळण घेण्याचे संकेत दिसत होते. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रे पक्षातील आपल्या पदाचा अद्याप राजीनामा दिला नाही. मात्र, आज (30 जुलै 2019) सकाळीच ते सातारा येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईत आल्यावर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदांचा राजीनामा देतील. तसेच, उद्या (31 जुलै 2019) ते भाजपमध्ये प्रवेश करतील असे समजते. राजकीय वर्तुळातही अशीच चर्चा सुरु असून, प्रसारमाध्यमांनीही अशाच आशयाचे वृत्त दिले आहे.
गणेश नाईक
एकेकाळी कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या गणेश नाईक यांनी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा खांद्यावर घेतली. गणेश नाईक यांच्यामुळे ठाणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार होण्यास मोठी मदत झाली. खास करुन गणेश नाईक या एकखांबी तंबूवर राष्ट्रवादी काँग्रेसने नवी मुंबई शहरावर आपली पकड मजबूत केली. दरम्यान, गणेश नाईक हे आता भाजपच्या वाटेवर असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. 31 जुलै रोजी भाजपच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात गणेश नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे समजते. अर्थात, गणेश नाईक यांनी या संभाव्य पक्षप्रवेशाबद्दल अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, प्रसारमाध्यमांनी विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात गणेश नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांसह भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली आहे. (हेही वाचा, Maharashtra Vidhan Sabha Election 2019: शिवसेना-भाजप युती, ठरुन मोडण्याची शक्यता; विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाकडून स्वबळाची चाचपणी)
चित्रा वाघ
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यासुद्धा भाजप प्रवेश करणार असल्याचे समजते. चित्रा वाघ यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. 31 जुलै रोजी आता त्या भाजप प्रवेश करणार असल्याचे समजते.
चित्रा वाघ फेसबुक पोस्ट
कालिदास कोळंबकर
प्राप्त माहितीनुसार, आमदार कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेस पक्षातील पदाचा राजीनामा नुकताच दिला. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोमवारी (29 जुलै 2019) रोजी त्यांनी आपला राजीनामा सोपवला. या राजीनाम्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
कालिदास कोळंबकर राजीनामा पत्र
दरम्यान, भाजपमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप हे दबावाचे राजकारण करत असून, त्या माध्यमातूनच ते विरोधी पक्ष फोडत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर, या आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजपने म्हटले आहे की, भाजप हा कोणताही पक्ष फोडत नसून, भाजपचे विचार आवडल्याने इतर पक्षातील लोक स्वत:हून पक्षात आकृष्ट होत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना प्रवेश देत आहोत, असे म्हटले आहे.