Maharashtra Assembly Budget Session: पुढील 3 महिन्यांसाठी वीजतोडणीला तूर्तास स्थगिती; उर्जामंत्री नितिन राऊत यांची घोषणा
Nitin Raut | PC: File Images

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज विरोधी पक्षाने शेतलर्‍यांच्या वीज तोडणीचा प्रश्न उचलून धरला आणि त्यावर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी उत्तर देत मोठी घोषणा केली आहे. नितीन राऊतांनी केलेल्या घोषणेनुसार पुढील 3 महिन्यांसाठी वीज तोडणी थांबवण्यात आली आहे तर तोडलेली वीज देखील पूर्ववत केली जाणार आहे. पीक शेतकर्‍यांच्या हातात येईपर्यंत वीज तोडणी थांबवत असल्याचे ते म्हणाले आहेत. सोबतच कृषी ग्राहकांना दिवसभर वीज मिळावी म्हणून समिती नेमली आहे ते एक महिन्यात अहवाल देणार असल्याची माहिती देखील नितीन राऊत यांनी सभागृहात दिली आहे.

मागच्या सरकारने वीज बिलं दिलेली नाहीत. बँकेचे कर्ज असल्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. परिणामी वीज पुरवठा खंडित करावा लागल्याचं सरकारचं मत आहे. डिसेंबर 2021 अखेरीपर्यंत महावितरणाची थकबाकी 63842 कोटी रुपये इतकी झालेली आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन कापणार नाही या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेचे काय झाले? शेतकरी कुणाला माफ करणार नाही असे म्हणत आक्रमक झाले. त्यानंतर गदारोळ झाल्याने दुपारी एक वाजता सभागृहाचं काम स्थगित करण्यात आले आहे. हे देखील नक्की वाचा: MSEDCL चे ग्राहक आता ऑनलाईन पाठवू शकतात मीटर रीडिंग; इथे पहा कसे, कधी, कुठे? 

वीज तोडणीमुळे मागील काही दिवसांत शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. पण सरकार हे मुद्दम करत नसल्याचे स्पष्टीकरण नितीन राऊत यांनी दिले आहे. सरकार सवलती देत असलं तरीही वीज बिल वेळेत भरा असं आवाहन त्यांनी केले आहे.