
महाराष्ट्र्र (Maharashtra), हरियाणा (Hariyana) आणि झारखंड (Jharkhand) या राज्यात विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections 2019) वारे वाहू लागले आहेत. अशातच सूत्राच्या अहवालानुसार येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्र्र व हरियाणा मधील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे समजत आहे. तर झारखंड येथील अतिरेकी कारवायांमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता आहे. वास्तविक महाराष्ट्रात देखील मागील काही दिवसात पावसामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती उदभवली होती याच पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी सुद्द्धा होत होती मात्र आता समोर आलेल्या वृत्तानुसार नियोजित वेळेतच निवडणूक घेण्यात येईल असे दिसत आहे.
हरयाणा आणि महाराष्ट्रात सध्याच्या सरकारचा कार्यकाळ अनुक्रमे 2 नोव्हेंबर व 9 नोव्हेंबर रोजी संपणार आहे, त्याआधी निवडणूक घेऊन नियोजित वेळेनुसार नवीन सरकारची स्थापना होणे गरजेचे असते. राष्ट्रीय निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नुकतेच महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवडणुक संबंधी सूचनापत्र देण्यात आले आहे. याचप्रमाणे दोन्ही राज्यातील निवडणूक कार्यात सहभागी अधिकाऱयांच्या विषयी देखील खास सूचना नमूद करण्यात आल्या आहेत. हे अधिकारी संबंधित राज्यात तीन वर्षाहून अधिक काळापासून कार्यरत नसतील किंवा येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत किंवा त्याआधी त्यांच्या कार्याचे तीन वर्ष पूर्ण झाले नसतील याची खातरजमा करून घ्यायची आहे.
दरम्यान, 2014 च्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात साधारण 20 सप्टेंबरच्या सुमारास निवडणुकांची घोषणा झाली होती, तसेच 15 ऑक्टोबर रोजी मतदान घेऊन 19 ऑक्टोबर रोजी निकाल घोषित करण्यात आले होते. यंदा मागील काही काळापासून गणेशोत्सवाच्या नंतर आचारसंहिता लागू होणार असल्याच्या चर्चा होत्या मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांनी जागावाटप ते प्रचारसत्र पर्यंत निवडणुकांच्या तयारीला जोमाने सुरुवात केली आहे.