धक्कादायक! राज्यात सत्ता स्थापनेसाठी नेते भांडत असताना, एका महिन्यात तब्बल 300 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या; चार वर्षांतील सर्वाधिक संख्या
Image used for representational purpose only (Picture Credits: PTI)

नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या. ज्यावेळी सर्व पक्षांचे नेते सत्तेवर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी (Maharashtra Farmer) अवकाळी पावसाने त्रस्त झाला होता. याच काळात फक्त एका महिन्यात महाराष्ट्रात तब्बल 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Suicide) केली असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. गेल्या 4 वर्षात एका महिन्यात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमधील ही सर्वाधिक संख्या आहे. 2015 मध्ये एका महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या 300 च्या वर गेली होती. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

महसूल विभागाच्या ताज्या आकडेवारीवर नजर टाकली तर, ऑक्टोबरमध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने आत्महत्येच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या पावसात शेतकर्‍यांचे 70 टक्के खरीप पीक नष्ट झाले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान आत्महत्येच्या घटनांमध्ये 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये दुष्काळग्रस्त मराठवाडा प्रदेशात सर्वाधिक 120 आत्महत्या आणि विदर्भात 112 आत्महत्या झाल्या आहेत.

2019 मध्ये महाराष्ट्रात एकूण 2,532 शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याची नोंद झाली आहे, तर 2018 मध्ये ही संख्या 2,518 होती. असा अंदाज आहे की, राज्यातील जवळजवळ एक कोटी शेतकर्‍यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ही संख्या स्वीडनच्या एकूण लोकसंख्येइतकी आहे आणि राज्यातील एकूण शेतकर्‍यांच्या संख्येपैकी दोन तृतीयांश आहे. यापैकी सुमारे 44 लाख शेतकरी मराठवाडा भागातील आहेत. आता राज्य सरकार या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत आहे.

(हेही वाचा: कोल्हापूर, नाशिक जिल्हा परिषद निवडणूक 2019: भाजप पराभूत; सत्तांतर करत महाविकासआघाडी सत्तेत)

याबाबत अधिका-यांनी सांगितले की आतापर्यंत 6552 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी वितरित केले गेले आहेत. डिसेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जे माफ करणार असल्याचे जाहीर केले होते. यापूर्वी सन 2017 मध्ये महाराष्ट्रातील भाजपा सरकारने 44 लाख शेतकर्‍यांचे 18 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते.