Coronavirus (Photo Credit: PTI)

Coronavirus: मुंबईत (Mumbai) 57 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोना बाधितांची संख्या 490 वर पोहचली आहे. आज मुंबईत एकूण 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 5 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

मुंबईमध्ये कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. सरकारकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. परंतु, तरीदेखील लोक घराबाहेर पडत आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. (हेही वाचा - Coronavirus: महाराष्ट्रात लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1410 जणांना अटक तर 65 लाखाहून अधिक दंड वसूल)

दरम्यान, राज्यात मुंबईत कोराना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईतील प्रभादेवी, वरळी, मलबार हिल, अंधेरी, भायखळा आणि मालाडमध्ये सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहे. मुंबईतील एकूण रुग्णांपैकी 53 टक्के रुग्ण हे या भागातील आहेत. याशिवाय मुंबईतील सर्वांत मोठी झोपडपट्टी धारावीलाही कोरोनाने विळखा घातला आहे. धारावीत नुकताच कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. बालिगा नगरमधील रहिवाशी असलेल्या या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला होता. आतापर्यंत धारावीत अडीच हजार लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.