महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Assembly Election 2024) जाहीर झाल्याने राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष उमेदवार यादी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, महायुती (MahaYuti) आणि महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) अद्यापही जागावाटप जाहीर करु शकले नाहीत. दरम्यान, या मुद्द्यावरुन घटक पक्षांमध्ये संघर्ष इतका तीव्र आहे की, महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचा राष्ट्रीय समाज पक्ष (Mahadev Jankar) थेट महायुतीतून बाहेर पडला आहे. या बाहेर पडण्याचे स्पष्ट कारण पुढे आले नसले तरी, जागावाटप आणि ते करत असताना पक्षाला मिळणारे स्थान, हिच त्यांच्या अस्वस्थतेचे कारण असावे, असा निष्कर्ष राजकीय वर्तुळात काढला जात आहे.
राजपा महायुतीतून बाहेर पडण्याचे कारण काय?
महादेव जानकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, आमचा कोणावरही राग नाही. महायुतीमधील सर्वच राजकीय पक्षांनी आमाला आदराची वागणूक दिली. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आम्हाला दोन जागा दिल्या होत्या. पण दुर्दैवाने आम्हाला त्या जिंकता आल्या नाही. असे असले तरी, आमच्या पक्षाने असा निर्णय घेतला आहे की, विधानसभा निवडणूक आपण स्वत: लढायला हवी. आपला पक्ष वाढला पाहिजे. संघटना मजबूत झाली पाहिजे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत आम्ही 288 जागा लढविण्याचे ध्येय ठेवतो आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला उमेदवार मिळतील, त्या त्या जागा आम्ही लढणार आहोत. या निवडणुकीत आम्ही काही जागा जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. तर काही ठिकाणी आम्हाला दुसऱ्या आणि काही ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचीही मते मिळवू असे, महादेव जानकर यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Mahadev Jankar on Gopinath Munde: पंकजा मुंडे यांच्यापेक्षा माझी वाताहत अधिक, महादेव जानकर असं का म्हणाले?)
महादेव जानकर नाराज
महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीमध्ये स्वत:ला एक महत्त्वाचा घटक पक्ष मानत होते. त्यामुळे त्यांचा पक्ष विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकांमध्ये महायुतीकडे तब्बल 40 ते 50 जागा मागत होते. याला युतीतील प्रमुख घटक पक्ष भाजप, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अपेक्षीत प्रतिसाद देत नव्हते. ज्यामुळे जानकर यांचा रासप नाराज होता. त्याची परिणीती महायूतीतून बाहेर पडण्यात झाली, असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Mahadev Jankar: मी पंतप्रधान होणारच, राष्ट्रीय समाज पक्षाचे अंतिम ध्येय दिल्ली : महादेव जानकर)
महादेव जानकर यांचे महायुतीतून बाहेर पडणे हा महायुतीसाठी धक्का मानला जात आहे. राज्यात राजकीय मंचावर बच्चु कडू यांची प्रहार संघटना, छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना तिसही आघाडी स्थापन करत असताना जानकर हे बाहेर पडले आहेत. त्यामुळे हा महायुतीसाठी धक्का मानला जात आहे.