Maha Vikas Aghadi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maha Vikas Aghadi Meeting Today in Mumba: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकासआघाडीची एक महत्त्वाची बैठक मुंबई येथे पार पडत आहे. या बैठकीला MVA घटक पक्षांचे सर्व आमदार उपस्थि राहणार आहेत. तसेच, आघाडीतील प्रमुख पक्षांचे नेते या बैठकीत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. ही बैठक एमसीए लाऊन्जमध्ये (MCA The Lounge) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पार पडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यास शरद पवार यांनी उपस्थित राहू नये, अशी महाविकासआघाडीतील घटक पक्षांची इच्छा होती. मात्र, हा दबाव झुगारून देत शरद पवार या कार्यक्रमास उपस्थित राहिले. त्यावरुन मविआमध्ये काहीशी नाराजी असल्याचे वृत्त आहे. आजच्या बैठकीत ही नाराजी व्यक्त होणार का? याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, या बैठकीत उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. खास करुन अजित पवार यांनी NCP मध्ये बंड केल्याने या बैठकांना अधिक महत्त्व आले आहे.

दरम्यान, मविआच्या आजच्या बैठकीस बाळासाहेब थोरात (काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते), अबू आझमी (समाजवादी पार्टी), जयंत पाटील (शेकाप), अजय चौधरी (शिवसेना (UBT) गटनेते, जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस), शिवसेना (यूबीटी) आमदार अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची उपस्थिती प्रमुख मानली जात आहे. त्यामुळे हे नेतेही काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

भारतीय जनता पक्षाला आणि खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जोडगोळीला राष्ट्रीय पातळीवर टक्कर देण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी विरोधकांनी एक सर्वपक्षीय आघाडी उभारली असून त्यात जवळपास 26 राजकीय पक्ष आहेत. या आघाडीचे नावही इंडिया (INDIA) असं ठेवण्यात आलं आहे. या आघाडीच्या दोन बैठका अनुक्रमे पाटना आणि बंगळुरु येथे पार पडल्या आहेत. तिसरी बैठक आता मुंबईमध्ये पुढच्या काहीच दिवसांमध्ये पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महविआच्या बैठकांना अधिक वेग आला आहे. या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.