मीरा भाईंदर (Mira Bhaindar) शहरात एका परिसरातील बस थांब्याला चक्क बांगलादेश (Bangladesh) असं नाव दिलेय. त्यामुळे खळबळ उडाली आहे. भाईंदर पश्चिम येथील उत्तन-चौक भागात पालिकेने असा हा प्रताप केला आहे. परराज्यातून आलेले विस्थापित नागरिक येथे राहत असल्यामुळे बांग्लादेश असे टोपण नाव या परिसराला पडले होते. मात्र आता पालिकेने परिवहन बस थांब्यावर नाव टाकल्याने येथील नागरीकांनी संपाप व्यक्त करत महापालिकेचा निषेध व्यक्त केला आहे. (हेही वाचा - Mumbai Shocker: मीरा भाईंदर मध्ये 13 वर्षीय मुलीचा विनयभंग, इस्लाम धर्मात जाण्यासाठी धमकावल्याची तक्रार; 2 जण अटकेत)
मिरा भाईंदर महानगरपालिकेने आपल्या एका परिसराच्या बस थांब्याला बांगलादेश असं नाव दिलं आहे. पालिकेच्या अधिका-यांनी हा प्रताप केल्याने येथील नागरीक कमालीचे संतापले आहेत. या ठिकाणी मच्छिमार कोळीबांधवांची गावे अधिक प्रमाणात आहे.पूर्वीपासूनच या किनाऱ्यावर मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे, येथे मासेमारीसाठी खलासी मजूरांची गरज भासत होती. खलासी मजूर पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणात आले होते. भाईंदरच्या पाली-चौक येथे ही वस्ती अधिक होती. यांची भाषा ही बंगाली असल्याने या ठिकाणाला बांग्लादेश वस्ती असं संबोधू लागले.
येथील नागरीकांच्या आधार कार्ड, लाईट बिल आणि पालिकेच्या घरपट्टीवर ही बांग्लादेश असं नाव लिहलं गेलं. आणि सर्वात मोठं म्हणजे मिरा भाईँदर महानगरपालिकेच्या अधिका-यांनी यावर लक्ष दिलचं नाही. यावर पालिकेचा कहर म्हणजे चक्क या परिसरातील बस थांब्यालाच बांग्लादेश असं नाव दिलं.