एकीसोबत प्रेम करुन तिला धोका (Love, Sex Aur Dhokha) देत दुसरीसोबतच संसार थाटण्यासाठी बोहल्यावर उभा राहcS अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. तरुणाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी मोठा तामझाम करत लग्नाचा मोठा बार उडवून दिला. वऱ्हाडी, वाजंत्री, जेवनावळ्या आणि आहेर माहेरांच्या दणक्यात लग्न सुरु होते. अक्षतांना काहीच वेळ बाकी होता. नवरा-नवरी मंडपात (Marriage Hall) आले. आता पुढच्या काहीच क्षणांत 'शुभमंगल..सावधान..' हे स्वर कानी पडणार इतक्यात विवाहस्थळी पोलिसांची एन्ट्री झाली. करवल्या आणि मित्रांच्या गराड्यात असलेल्या नवरदेवाला पोलिसांनी विवाहाच्या कपड्यांतच उचलले आणि थेट पोलीस स्टेशनला आणले. लग्नाची वरात अशा पद्धतीन पोलिस स्टेशनच्या दारात पोहोचल्याने परिसरात नेमके घडले काय याची भलतीच चर्चा सुरु झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील पंकज नामक तरुणाचा विवाह नाशिक येथील तरुणीशी ठरला होता. ठरल्या प्रमाणे लग्नाचे सगळे सोपस्कार पार पडले आणि नवरा नवरी निश्चित वेळी मंडपात आली. सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचला होता. इतक्यात एक तरुणी आणि राहता पोलीस लग्नाच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी मंचावर जाऊन थेट नवरदेवालाच ताब्यात घेतले. घडल्या प्रकाराने सर्वच लोक बावचळून गेले. काय करावे त्यांना कळत नव्हते. सर्वच जण एकमेकांना काय घडले विचारत होते. (हेही वाचा, Fraud For Marriage: मनासारखा जोडीदार शोधण्याच्या नादात Matrimony Site वरुन महिलेची 2.77 लाख रुपयांची फसवणूक)
त्याचे घडले असे की, पोलिसांसोबत आलेली तरुणी ही नवरदेव असलेल्या पंकज याची प्रेयसी होती. असाही दावा करण्या येत आहे की, पाठिमागील प्रदीर्घ काळापासून ते एकत्र राहतात. त्यांनी अनेकदा शरीरसंबंध ठेवले आहेत. लग्नाच्या आणाभाका घेतल्या आहेत. आयत्या वेळी मात्र पंकजने लग्नाला नकार देत भलत्याच तरुणीसोबत लग्नाचा घाट घातला. परिणामी तरुणीने (नवरेदवाची पूर्वीची प्रेयसी) पोलिसांत फसवणूक आणि शारीरिक अत्याचाराची तक्रार दिली. पोलिसांनी नियम आणि कायद्याला अनुसरुन कारवाई केली. तरुणाला लग्नमंडपातून उचलून पोलीसस्टेशनच्या दारात आणले.
दरम्यान, तक्रारदार तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पंकज याच्यावर कलम 376 आणि 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. आरोपी नवरदेव यालाही सध्या नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.