लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदाना दिवशी 'मुंबई'तील तीन ठिकाणांहून 75 लाखांची रोकड जप्त
Cash | Representational Image | (Photo Credits: PTI)

देशासह राज्यात लोकसभा निवडणूकीची (Loksabha Elections 2019) रणधुमाळी सुरु आहे. काल (18 एप्रिल) दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 10 मतदारसंघात मतदान पार पडलं. मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग अधिक सतर्क असून तपासणी पथकाने केलेल्या कारवाईत मुंबई शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल 75 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. (मुंबई: सायन परिसरामध्ये निवडणूक आयोग भरारी पथकाची कारवाई! 11लाख 85 हजार रुपयांची संशयित रक्कम ताब्यात)

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील एस. व्ही. पी रोड, भायखळा परिसरातील बी. जे. रोड आणि ई. एम. पाटणवाला मार्गावरुन ही संशयित रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. मुंबईतील एस. व्ही. पी. रोडवरील गोल देऊळ परिसरात हुन्दाई i20 या कारची तपासणी करण्यात आली. त्यात 10 लाखांची रक्कम आढळून आली. तर भायखळा परिसरातील बी. जे. रोड तांबीट नाका परिसरात ओला अॅसेन्ट गाडीत 49 लाख 98 हजार 500 रुपयांची रोकड सापडली. त्याचबरोबर भायखळा येथील ई. एम. पाटणवाला मार्गावर राणीच्या बागेजवळ ईको स्पोर्ट्स फोर्ड कारमध्ये 15 लाखांची रक्कम आढळली.

या प्रकरणांची खबर आयकर विभागाला देण्यात आली असून आयकर विभागाकडून याची कसून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली आहे.