शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मते, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) महाविकास आघाडी (MVA) सोबत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगितले की, मित्रपक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जरी निश्चित झालेला नसला तरी, गेल्या निवडणुकीत शिवसेनेने (अविभाजित) जिंकलेल्या 19 जागा त्यांच्या पक्षाकडेच राहणार आहेत.
राऊत यांनी नांदेडमध्ये पत्रकारांना सांगितले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने (अविभाजित) महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 18 आणि दमण आणि दीवमध्ये एक जागा जिंकली होती.
राज्यातील गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अविभाजित शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या, मात्र पक्षनेतृत्वाविरुद्ध बंडखोरी करून 13 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. आता राऊत म्हणाले की, ‘काही विद्यमान खासदार पक्षांतर झाले असले तरी, जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत आणि त्या आमच्याकडेच राहतील.’ ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) जिंकलेले चार मतदारसंघ आणि काँग्रेसने जिंकलेला एक मतदारसंघही त्यांच्याकडे राहील.
शिवसेनेचे (UBT) राज्यसभा सदस्य संजय राऊत म्हणाले की, मित्रपक्षांमध्ये कोणताही फरक नाही, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढवू आणि विद्यमान सरकारचा पराभव करू. दुसरीकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडी सहयोगी एक समिती स्थापन करतील, असे महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी शुक्रवारी सांगितले. निवडणुकीतील गुणवत्तेनुसार जागावाटप केले जाईल, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: महाराष्ट्रात पक्ष विस्ताराची Bharat Rashtra Samithi ची मेगा योजना; नांदेड येथे कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन, CM KCR करणार संबोधित)
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे 2024 मध्ये होणे अपेक्षित आहे, तर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. अशाप्रकारे संजय राऊत यांच्या वक्त्यव्यावरून दिसत आहे की, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी महाविकास आघाडीने आतापासूनच सुरु केली आहे.