जळगाव: भाजप माजी आमदारास मारहाण, गिरीश महाजन यांना धक्काबुक्की; अमळनेर येथे पक्ष मेळाव्यात जोरदार राडा (Video)
Girish Mahajan | (Photo Credits-Facebook)

Lok Sabha Elections 2019: राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Minister Girish) यांना जोरदार धक्काबुक्की करण्यात आली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) येथे भाजप (BJP)- शिवसेना (Shiv Sena) मेळाव्यात ही घटना घडली. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यातही जोरदार हाणामारी झाली. मात्र, हा प्रकार नेमका का घडला याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार घडत असताना जलसंपदा मंत्री गिरीश माहजन यांना मारहाण झाल्याचीही चर्चा आहे. मात्र, गिरीश महाजन यांना धक्काबुक्की झाली की मारहाण याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकली नाही. गिरीश महाजन हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्याच्यासोबत हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघ हा आगोदरपासूनच चर्चेत आहे. मात्र, स्मिता वाघ यांची उमेदवारी भाजपने रद्द केल्यानंतर तो अधिक चर्चेत आला. भाजपने या मतदारसंघातून आगोदर स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. वाघ यांना भाजपचे तिकट जाहीर झाल्यावर पक्षाच्या उमेदवार यादीतही त्यांचे नाव आले होते. परंतू, आयत्या वेळी पक्षांतर्गत चक्रे वेगाने फिरली आणि वाघ यांची उमेदवारी आयत्या वेळी पक्षाने रद्द केली. वाघ यांच्याऐवजी आता भाजपने उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार गुलाबराव देवकर अशी लढत होणार आहे. (हेही वाचा, राज ठाकरे विरोधात अर्वाच्च्य भाषेत लिखाण करणार्‍या विजय वारे यांना मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप)

दरम्यान, आयत्या वेळी उमेदवारी रद्द केल्यामुळे स्मिता वाघ गटात प्रचंड नाराजी आहे. पक्षाने दिलेली उमेदवारी नाकारणे म्हणजे हा राजकीय कोल्ड ब्लडेड मर्डर आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया स्मिता वाघ यांनी तिकीट कापल्यानंतर दिली होती.