Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 2019 एकूण सात टप्प्यात पार पडत आहे. त्यातील पहिल्या टप्प्यासाठी उद्या म्हणजेच बुधवार दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी महाराष्ट्रातील 48 पैकी एकूण 7 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडते आहे. त्यात वर्धा (Wardha) , रामटेक (Ramtek), नागपूर (Nagpur), भंडारा-गोंदिया (Bhandara- Gondiya), गडचिरोली-चिमूर (Gadchiroli-Chimur), चंद्रपूर (Chandrapur) आणि यवतमाळ (Yavatmal-Washim) अशा सात लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सातमेध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी, हंसराज अहिर यांचे मतदारसंघ येत असल्यामुळे या लढतीविषयी उत्सुकता आहे.
दरम्यान, नागपूर लोकसभा मतदारसंघाबाबत कमालीची उत्सुकता आहे. या मतदारसंघातून भाजपच्या वतीने नितीन गडकरी रिंगणात आहेत. तर त्याच्या विरोधात नाना पटोले हे काँग्रेसची बाजू लढवत आहेत. नाना पटोले यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदीया लोकसभा मतदारसंघातून भाजपकडू निवडणूक लढवली होती. त्यात ते निवडणूनही आले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि भाजपशी न पटल्याने खासदारकीचा राजीनामा देऊन ते काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले. आता ते आपला भंडारा गोंदीया मतदारसंघ सोडून नागपूर लोकसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यामुळे हा सामना थेट नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले असा होणार आहे.
दुसऱ्या बाजूला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातही जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. येथून केंद्रीय मंत्री हंसराज अहिर हे भाजप उमेदवार आहेत. तर, त्यांच्या विरोधात नामदेव मुसंडी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहूजन आघाडीने एन. के. नान्हे यांच्या रुपाने दोन्ही उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमिवर कोण बाजी मारणार हे लवकरच कळणार आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election 2019: घरबसल्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव, मतदान केंद्र कसं पहाल?)
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातही अशीच लढत आहे. या मतदारसंघातून सत्ताधारी पक्षाच्या भावना गवळी विद्यमान खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा गवळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. गवळी यांच्या विरोधात काँग्रेसने माणिकराव ठाकरे यांना मैदानात उतरवले आहेत. माणिकराव ठाकरे हे देखील काँग्रेसमधील बडे प्रस्थ आहे. त्यामुळे या निवडणूकीत कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.