![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/04/BJP-Shiv-Sena-NCP-and-Congress-Parties-Denied-11-MPs-Lok-Sabha-Ticket-380x214.jpg)
Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक लढवताना भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena) , काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) या प्रमुख पक्षांनी महाराष्ट्रातील उमेदवारी जाहीर करताना बरीच खबरदारी घेतली आहे. उमेदवरी जाहीर करताना या पक्षांनी जवाळपास 11 विद्यमान खासदारांना डच्चू देत तिकीट नाकारले आहे. यात भाजप, राष्ट्रवादी या पक्षांच्या अनुक्रमे 7 आणि 2 तर, शिवसेना, काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.
दरम्यान, तिकीट वाटपावर नजर टाकता भाजपने 23 पैकी 7 खासदारांना वगळून उर्वरीत 16 खासदारांवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. तर, शिवसेनेनेही एकाचा अपवाद वगळता आपल्या पहिल्याच विद्यमान 17 खासदारांवर उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेने केवळ रवींद्र गायकवाड या एकमेव खासदाराला तिकीट नाकारले आहे. रवींद्र गायकवाड हे विमान प्रवासात एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे चर्चेत आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयसिंह मोहिते-पाटील आणि मधुकर कुकडे यांच्या रुपात दोन खासदारांना तिकीट नाकारले आहे. त्यापैकी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या चिरंजीवांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मोहिते-पाटील परिवाराचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेले संबंध संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. मधुकर कुकडे हे भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. मात्र, त्यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. (हेही वाचा, स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांना अटक)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/04/11-Mps-From-The-Maharashtra-State-Denied-Lok-Sabha-Ticket.jpg)
काँग्रेसबाबत बोलायचे तर, 2014 च्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे केवळ 2 उमेदवार महाराष्ट्रातून निवडूण आले होते. त्यापैकी एक नांदेड येथून अशोक चव्हाण तर, हिंगोली येथून राजीव सातव यांचा समावेश होता. या निवडणूकीत राजीव सातव हे निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. सातव यांच्यावर गुजरात काँग्रेसची जबाबदारी असल्यामुळे ते निवडणूक लढवत नसल्याचे सांगितले जात आहे. परंतू, अशोक चव्हाण यांच्यासोबत मतभेद झाल्यामुळेच त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.