स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांना अटक
Jaydeep Kawade and Smriti Irani | (Photo Credits: Facebook)

Lok Sabha Elections 2019: पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (PRP) संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) यांचे पुत्र जयदीप कवाडे (Jaydeep Kawade) यांना अटक करण्यात आली. तसेच, काही काळात त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. काँग्रेस उमेदवार नाना पटोले (Nanabhau Patole) यांच्या प्रचारासाठी नागपुर (Nagpur) येथील बगडगंज भागात प्रचार करत असताना जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्याबद्दल आक्षपार्ह टिप्पणी केली. या टिप्पणीवर आक्षेप घेत, निवडणूक अधिकारी मदन सुबेदार यांनी जयदीप कवाडे यांच्याविरोधात लकडगंज पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

काय म्हणाले जयदीप कवाडे

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, 'स्मृती इराणी या नेहमी संविधान बदलण्याची भाष करतात. संविधान बदलणं म्हणजे नवरा बदलण्याएवढं सोप नाही. मी तुम्हाला स्मृती इराणी यांच्याबद्दल सांगतो, त्या आपल्या कपाळावर भलमोठं कुंकू लावतात. पण, सतत पती बदलवणाऱ्या महिलांच्या कपाळावरचं कुंकूही वाढत राहतं असं मी ऐकलं आहे,' असं विधान जयदीप कवाडे यांनी केले आहे. नाना पटोले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत कवाडे बोलत होते.

अटक आणि जामिनावर सुटका

जयदीप कवाडे यांनी केलेले भाषण काही काळातच सोशल मीडियावर व्हायरल झालं. हे भाषण व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र भाजपने त्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक अधिकारी मदन सुबेदार यांनी जयदीप कवाडे यांच्याविरोधात लकडगंज पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी जयदीप कवाडे यांच्या विरोधात भा. दं. सं. कलम २९५ (अ) (धार्मिक भावना दुखावने) , कलम ५०० ( मानहानी, आक्षेपार्ह टिप्पणी करणे) , आणि २९४ आणि १७१ (जी) अन्वये निवडणुकीसंदर्भात खोटं बोलल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यावर कवाडे यांना अटक करण्यात आली. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. (हेही वाचा, नागपूर लोकसभा मतदारसंघ: नितीन गडकरी यांच्या होम पिचवर नाना पटोले विजयाचा सिक्सर मारणार का? लोकसभा निवडणूक 2019 - आव्हाने आणि जमेच्या बाजू)

नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले थेट संघर्ष

भांडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी होत खासदार झालेले नाना पटोले या वेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. इथे त्यांचा सामना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याशी होत आहे. नितीन गडकरी हे मुळचे नागपूरचे आहेत. इथे भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांचे जाळेही मजबूत आहे. गडकरी यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. तर, सरकारविरोधात जनतेत असलेला राग आणि आजवर निवडणुका जिंकण्याचा अनुभव ही नाना पटोले यांच्यासाठी जमेची बाजू आहे. नाना पटोले आजवर एकही निवडणूक पराभूत झाले नाही, असे त्यांचे समर्थक सांगतात. त्यामुळे नागपूर मतदारसंघातील सामना मोठा उत्सुकता वाढवणारा ठरला आहे.