लोकसभा निवडणूकीची धामधूम आता वाढू लागली आहे. देशभरात 7 टप्प्यात होणार्या या निवडणूकीमध्ये आता 7 मे दिवशी तिसरा टप्पा आहे. त्यापैकी सांगली मध्ये कॉंग्रेसच्या बंडखोर विशाल पाटील (Vishal Patil) यांना वंचित (VBA) कडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. विशाल पाटलांसमोर महाविकास आघाडी कडून चंद्रहार पाटील तर महायुती कडून संजय काका पाटील निवडणूकीच्या रिंगणात आहेत. सांगलीतून ओबीजी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे देखील निवडणूक रिंगणात आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला होता मात्र त्यांनी आता निर्णय फिरवत शेंडगेंऐवजी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सांगलीत याचा परिणाम काय होणार? यामुळे मविआ ची डोकेदुखी वाढणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. विशाल पाटील यांना अर्ज मागे घेण्यासाठी कॉंग्रेस कडून अनेक प्रयत्न झाले मात्र विशाल पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले. नक्की वाचा: Vishal Patil: उमेदवारीतून पत्ता कट होताच विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक; सांगली येथील काँग्रेस कार्यालयात तोडफोड .
मागील निवडणूकीमध्ये ज्या वंचितमुळे पाटलांचा पराभव झाला, त्याच वंचितनं आता पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सांगलीत राजकीय गणितं फिरु शकतात. अशी चर्चा आता सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांचे भाऊ प्रतीक पाटील यांनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज प्रकाश आंबेडकरांनी हा पाठिंबा जाहीर केला आहे.
कॉंग्रेस कडून विशाल पाटील यांच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे. त्यांच्यावर कठोर कारावाई केली केली जाईल असं काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. विशाल पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत.