Lok Sabha Election 2024: अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी खास टपाली मतदानाची सुविधा; जाणून घ्या कुठे सादर कराल अर्ज
Election | (Representational Image)

Lok Sabha General Election 2024: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने केवळ अत्यावश्यक सेवेत मतदानाच्या दिवशी कार्यरत असल्यामुळे मतदान न करू शकणाऱ्या मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान (Voting By Postal Ballot) करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधा प्रक्रियेसाठी संबंधित विभागाने समन्वय अधिकारी नियुक्त करणे आवश्यक असल्याचे, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी कळविले आहे.

राज्यातील पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणारे लोकसभा मतदारसंघ 02 धुळे, 20 दिंडोरी, 21 नाशिक, 22 पालघर, 23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे, 26 मुंबई उत्तर, 27 मुंबई उत्तर-पश्चिम, 28 मुंबई उत्तर-पूर्व, 29 मुंबई उत्तर-मध्य, 30 मुंबई दक्षिण मध्य, 31 मुंबई दक्षिण असे आहेत.

शेवटच्या टप्प्यातील 13 लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांची मतदार नोंदणी झालेली आहे आणि त्यांची 20 मे 2024 रोजी अत्यावश्यक सेवेत ड्युटी असल्यामुळे त्यांना मतदान केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान करणे शक्य होणार नाही, फक्त अशा मतदारांनी अर्ज क्र.12-ड भरुन समन्वय अधिकारी यांचेमार्फत 1 मे पर्यंत खालील पत्त्यावर सादर करावयाचे आहेत.

संपर्क- बप्पासाहेब थोरात (9923973888)

पत्ता-

समर्पित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, ओल्ड कस्टम हाऊस, दुसरा मजला, कक्ष क. 205, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई 400001 (हेही वाचा: Sharad Pawar : 'पुतीन आणि नरेंद्र मोदी यांच्यात फरक नाही'; भाजपच्या जाहीरनाम्यावर बोलताना शरद पवारांची घणाघाती टीका)

हे अर्ज समन्वय अधिकारी यांनी तपासून साक्षांकित करून सादर करावयाचे आहेत. मंजूर झालेल्या अर्जाबाबत संबंधित मतदारास मोबाईलद्वारे एसएमएस किंवा नोडल ऑफिसर यांचेमार्फत कळविले जाईल. टपाली मतदान केंद्र (पोस्टल व्होटिंग सेंटर) हे निवडणूक निर्णय अधिकारी, 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघ यांचे कार्यक्षेत्रात असणार आहे. हे सुविधा केंद्र 14 मे ते 16 मे 2024 या तीन दिवसात सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यरत असेल.

टपाली मतदान केंद्र सुविधा ही अतिरिक्त सुविधा आहे. या व्यतिरिक्त मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोग प्रोत्साहन देत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.