![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/03/Leopards-380x214.jpg)
नाशिक (Nashik) मध्ये पुन्हा एकाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये (Leopard Attack) मृत्यू झाला आहे. ही घटना इगतपुरी (Igatpuri) मधील निशाणवाडी त्रिंगलवाडी मधील आहे. बिबट्याने आज (30 जानेवारी) पहाटेच्या सुमारास तरुणीवर हल्ला केला. या बिबट्याच्या हल्ल्यात 31 वर्षीय तरूणी मृत्यूमुखी पडली आहे. मृत तरूणीचं नाव मीनाक्षी शिवराम झुगरे आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी इगतपुरीमध्येच धार्णोली मध्ये एका शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला होता.
मीनाक्षी आज सकाळी घराबाहेर पडताच तिच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला आणि यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती प्रादेशिक वनविभागाला मिळताच परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. निशाणवाडी सह बिबट्याचा वावर असलेल्या तालुक्याच्या सर्व भागात तत्काळ पिंजरा लावून त्यांचा बंदोबस्त करावा. पीडित तरुणीच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. Mumbai: फिल्मसिटी गोरेगावमध्ये टीव्ही मालिकेच्या सेटवर बिबट्या (Watch Video) .
काही दिवसांपूर्वी शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला तेव्हा त्याने जीवावर उदार होत बिबट्याशी कडवी झुंज दिली. मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेला. जखमी योगेशला उपचारासाठी घोटी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 26 जानेवारीला कोटमगाव परिसरातही बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात पीडीत व्यक्तीच्या यांच्या डोक्याला बिबट्याचे नख लागले होते.