मुंबईतील (Mumbai) आरे कॉलनीमध्ये (Aarey Colony) बिबट्याचा (Leopard) वावर मानवी हद्दी मध्ये होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान काल रात्री एका 4 वर्षांच्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यातून बचावण्यात नागरिकांना यश आलं आहे. आयुष यादव असं या 4 वर्षीय मुलाचं नाव आहे. तो युनीट नंबर 3 मध्ये राहतो. काल रात्री साडे आठच्या सुमारास तो खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.
आयुष यादवला बिबट्या घेऊन जात असल्याचं आजुबाजूच्या नागरिकांना समजताच त्यांनी पाठलाग केला. लोकांचा गदारोळ ऐकून बिबट्या देखील सावध झाला आणि त्याने आयुषला मध्येच सोडून दिलं. नागरिकांना आयुष झाडा-झुडपामध्ये रडताना आढळला. हेदेखील वाचा- आरे वसाहतीत सुरु होणार नवी 'राणीची बाग'.
आयुष यादवच्या मानेला, डोक्याला इजा झाली होती. तातडीने त्याला जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरला हलवण्यात आले. त्याच्या जखमांवर इलाज केल्यानंतर हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली. मागील काही काही महिन्यातील आरे कॉलनी मध्ये बिबट्याच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. आयुषचे वडील हे आरे कॉलनीत गोठ्यामध्ये काम करतात.
मध्यंतरी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने देखील त्याच्या राहत्या घराच्या खिडकीतून समोरच फिरत असलेल्या बिबट्याचे काही फोटोज सोशल मीडीयामध्ये शेअर केले होते.