BJP Leader Devendra Fadnavis | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. नुकतीच महाविकास आघाडी सरकारची (Maha Vikas Aghadi) बैठक पार पडली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्त्यूत्तर दिले आहे. देशातले सगळ्यात जास्त रुग्ण ज्या राज्यात आहेत त्या सरकारमधले मंत्री स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला मित्र कोण आणि शत्रू कोण हे चांगलंच माहित आहे. सरकारला आम्ही मदतच करतो आहोत. मात्र, सरकारच्या वतीने फेकाफेक केली जात असेल तर, त्याचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल असेही फडणवीस यांनी म्हटले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीची वास्तविक माहिती दिली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. हे देखील वाचा- आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीची होणार पुन्हा चौकशी; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश

व्हिडिओ-

भाजपा हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला कालपासून पडला आहे. देवेंद्र फडणवीस हे कोविड आणि करोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभे राहतील असे वाटले होते. मात्र, दुर्दैवाने तसे झाले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली आकडेवारी चांगली आहे. मात्र, त्यात तथ्य नाही असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. ते महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. नुसती आकडेवारी सादर करण्यापेक्षा आम्हाला साथ द्या. तसे झाले तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरणार नाही असा टोलाही पाटील यांनी लगावला होता.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आभासी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला आम्ही प्रत्यक्ष उत्तर देतो आहोत. आभासी चित्राला आम्ही थेट उत्तर देत आहोत असे परब म्हणाले आहेत. सुरुवातीला सगळा खर्च आम्हीच करु असे केंद्राने सांगितले होते. मात्र, तसे काहीही नाही असे महाविकास आघाडीचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहेत.