2018 मध्ये रिपब्लिक टीव्हीसह (Republic TV) तीन कंपन्यांनी थकबाकी न भरल्याचा आरोप करत, अन्वय नाईक (Anvay Naik) व त्यांच्या आईने आत्महत्या केली होती. याबाबत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) आणि इतर दोन जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुरेसा पुरावा मिळालेला नाही, असे सांगून गेल्या वर्षी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पोलिसांनी हे प्रकरण बंद केले होते. मात्र आता दोन लोकांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या प्रकरणात, महाराष्ट्र सरकारने मंगळवारी राज्य सीआयडीला वृत्तवाहिनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि इतर दोन जणांविरूद्ध नव्याने चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) याबाबत म्हणाले की, अन्वय नाइक यांची मुलगी अदन्या नाइक यांच्या विनंतीवरून सीआयडी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करेल. सन 2018 मध्ये अन्वय नाईक आपली आई कुमुद नाईकसमवेत रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील बंगल्यात मृत अवस्थेत आढळले होते. या संदर्भात, अर्णब गोस्वामी आणि इतर दोन जणांवर अन्वय नाईक आणि त्याच्या आईला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. गोस्वामी आणि इतर दोन जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे सांगून, गेल्या वर्षी स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण बंद केले होते.
अनिल देशमुख ट्वीट-
Adnya Naik had complained to me that #AlibaugPolice had not investigated non-payment of dues from #ArnabGoswami's @republic which drove her entrepreneur father & grandmom to suicide in May 2018. I've ordered a CID re-investigation of the case.#MaharashtraGovernmentCares
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 26, 2020
अन्वय मुंबईस्थित आर्किटेक्चरल आणि इंटिरियर डिझायनिंग कंपनी कॉनकॉर्ड डिझाईनचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, तर त्याची आई कंपनीचे बोर्ड संचालक होती. आपल्या वडिलांना 83 लाख रुपये न दिल्याबद्दल पोलिसांनी गोस्वामीची चौकशी केली नव्हती, यामुळे वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप अदन्याने केला होता. याबाबत रिपब्लिक टीव्हीने म्हटले आहे की, कॉनकॉर्ड डिझाइनची थकबाकी कंपनीने भरली आहे. मंगळवारी देशमुख यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, 'अदन्या नाईक यांनी माझ्याकडे तक्रार केली होती की, अलिबाग पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीकडून थकबाकी न भरल्याबद्दल अर्णब गोस्वामीची चौकशी केली नव्हती, ज्यामुळे मे 2018 मध्ये त्यांचे उद्योजक वडील आणि आजी यांनी आत्महत्या केली. मी या प्रकरणाची सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.' (हेही वाचा: लॉकडाउनच्या काळात अवैध मद्य विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी 6,332 गुन्हे दाखल; आतापर्यंत 2,958 आरोपींना अटक तर, 17 कोटींचा मुद्देमाल जप्त)
त्यावेळी पोलिसांना इंग्रजीत लिहिलेली एक सुसाइड नोट सापडली होती, ज्यामध्ये म्हटले होते, रिपब्लिक टीव्ही, स्कायमिडियाचे फिरोज शेख आणि स्मार्टवॉर्कचे नितीश सारडा यांच्याकडून त्यांची थकबाकी मिळत नसल्यामुळे अन्वय आणि त्याच्या आईने हे पाऊल उचलले आहे. या तिन्ही कंपन्यांकडे अनुक्रमे 83 लाख, चार कोटी आणि 55 लाख रुपयांची थकबाकी होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की तपासणी दरम्यान समजले की, अन्वय खूप कर्जात आहे आणि कंत्राटदारांचे पैसे देण्यास असमर्थ आहे.